अयोध्येत होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी पक्षरक्षा आंदोलन करणे गरजेचे आहे. त्यांचे खासदार आणि आमदार त्यांच्यासोबत राहण्यास तयार नाहीत. राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये शेकडो करोडाचा घोटाळा गंभीर बाब आहे. चोरीच्या प्रकारामुळे देशाची अब्रू गेली आहे. ज्यांनी घोटाळा केला आहे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सक्रियपणे काम करत आहे.
नंतर ते म्हणाले की, “उध्दव ठाकरेंनी जेव्हा राम मंदिरात जायला हवे होते, तेव्हा ते गेले नाहीत. आता ते राम मंदिरात जात आहेत. त्यांनी रामाच्या रक्षणासाठी जावे, मात्र त्यांचे आमदार आमच्याकडे येऊ नयेत याची काळजी त्यांनी घ्यावी. हे कोणतेही ‘टायगर ऑपरेशन, देवेंद्र ऑपरेशन’ नाही. तर हे उध्दव ठाकरे ऑपरेशन आहे. उद्धवजींनी स्वतःचे आमदार आणि खासदार सांभाळावेत. आम्हाला कोणाला फोडण्याची आवश्यकता नाही. केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे.
हेही वाचा – Eknath Shinde Health Update: मोठी बातमी! राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल, उपचार सुरू
पुढे ते म्हणाले की, “लोक स्वतःहून आमच्याकडे येत आहेत. आमच्याकडे येण्यासाठी दरवाजे खुले आहेत. मात्र एकदा आले की दरवाजे बंद होतात. ते परत जाण्याचा प्रश्नच राहत नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक लोक आमच्याकडे येत आहेत. जे येतील त्यांना घेण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, सगळेच आले तरी आम्ही सगळ्यांनाच पक्षात घेऊ, असे नाही.” रामदास आठवलेंच्या या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.