Raju Shetti : एक किलोमीटरला 254 कोटी?; राजू शेट्टींचा थेट सवाल, शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावरून सरकारवर डागली तोफ

दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला, तरी त्याच्या वाढत्या खर्चावरून आता विरोधक अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
Raju Shetti : एक किलोमीटरला 254 कोटी?; राजू शेट्टींचा थेट सवाल, शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावरून सरकारवर डागली तोफ

मुंबई: शक्तीपीठ महामार्गाच्या वाढीव खर्चावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधत, “फोंड्या माळावर 1 किलोमीटर रस्ता करण्यासाठी तब्बल 254.54 कोटी रुपये कशासाठी लागतात?” असा थेट सवाल केला आहे.

राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या शक्तीपीठ महामार्गाची लांबी 802 किलोमीटर असून त्यासाठी सुमारे 86 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यानुसार या महामार्गाच्या प्रत्येक किलोमीटरचा खर्च सुमारे 107.23 कोटी रुपये येत होता. मात्र, आता हा महामार्ग माण-खटाव मार्गे वाढवून त्याची लांबी 856.94 किलोमीटर करण्यात आली आहे.

यामुळे महामार्गात 54.94 किलोमीटरची वाढ झाली असली, तरी एकूण खर्च थेट 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप केला जात आहे. म्हणजेच केवळ 54.94 किलोमीटर अतिरिक्त रस्त्यासाठी सुमारे 14 हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा: Stock Market Today: क्रूड ऑईल स्वस्त आणि शेअर बाजार मस्त; सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला; निफ्टीनेही ओलांडला 24200 चा टप्पा

याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी सरकारवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला. “माण-खटावच्या माळरानावरून जाणाऱ्या रस्त्यासाठी 1 किलोमीटरमागे 254.54 कोटी रुपये खर्च होणार असतील, तर हे सामान्य जनतेच्या पैशांचे काय चालले आहे?” असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “पैसे किती खायचे यालाही काही प्रमाण असावे. आर्थिक घोटाळ्यांचे धडे घ्यायचे असतील, तर त्याची शिकवणी सरकारकडे घ्यावी लागेल,” असा टोला त्यांनी सरकारला लगावला. तसेच, “सत्ता आली म्हणून माया जमवायची असेल, तर ती महाराष्ट्रातील जनतेला लुटून जमवू नका,” असा परखड इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला, तरी त्याच्या वाढत्या खर्चावरून आता विरोधक अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. या आरोपांवर सरकारकडून काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: BKC Crane Accident: बीकेसीत पहाटेच्या अंधारात क्रेन उलटून कोसळला मेट्रोचा महाकाय बीम; विकासाच्या वेगाला अपघाताचं ग्रहण?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version