Rajan Teli: मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माजी आमदार राजन तेली यांनी धक्का दिला आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीवेळी ऑक्टोबर महिन्यात तेली यांनी ठाकरेंंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, एका वर्षभरातच राजन तेली यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे पाहायला मिळत आहे.
तेलींनी ठाकरेंची साथ का सोडली?
राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने सिंधुदुर्गात विविध चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा बँकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शिंदे सेनेत प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहारातील फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेलींसह आठ जणांविरोधात तक्रार करण्यात आली होती. मुंबई येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलीस अधीक्षक यांनी या तक्रारीवर चौकशीचे आदेश दिले. आरोप असलेल्या कर्जदारांमध्ये प्रथमेश राजन तेली, सर्वेश राजन तेली, प्रदीप मनोहर केरकर, शैलजा एम. सिंगबाळ, सीमा महेश सबनीस, राजन कृष्णा तेली, रुजिता राजन तेली, सुनील कृष्णा निरवडेकर यांचा समावेश आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठी माजी आमदार राजन तेली यांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर शिंदे सेनेत प्रवेश केल्याची चर्चा सिंधुदुर्गात आहे.
हेही वाचा:Dussehra Melava 2025: ज्यांना आयुष्यभर त्रास दिला त्या राज ठाकरेंना आता आय लव्ह यू म्हणताय…; गुलाबराव पाटील यांची ठाकरे सेनेवर टीका
कोण आहेत राजन तेली?
राजन तेली यांचा जन्म 25 जून 1990 साली कुडाळ तालुक्यातील घोडगे या गावात झाला. 1985 साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व केलं. 1988 साली त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये शिवसेना शाखाप्रमुख पद मिळालं. 1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली. 1995 साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषविले. 1997 साली त्याच्यावर कोकण सिंचन महामंडळाची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. 2005 साली राणे समवेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राणे समवेत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. 2007 साली ते विधान परिषद आमदार झाले. 2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँकेच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2016 साली राजन तेली यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत राज्य सचिव पद दिलं. 2020 साली त्यांना भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद मिळालं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.