गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. राधानगरी धरण पुर्ण भरले होते. पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राधानगरी धरण परिसरामध्ये पावसाने संततधार पडत आहे.
धरण पूर्णपणे भरल्यामुळे धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून सध्या 11 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदीपात्राजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता पाण्यात न जाण्याचा इशारा ग्रामस्थांना देण्यात आला आहे. आसपासच्या काही गावांना स्थलांतर करण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोल्हापूरमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे स्थानिक जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे दिसुन आले आहे. याचा परिणाम वाहतूकीवर झाला आहे. बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफला टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राधानगरी, कुंभी, कासारी, तुळशी, वारणा आणि दूधगंगा या नद्यांच्या परिसरामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर पाण्याखाली जाण्याची शक्यता दर्शवली आहे.
कोल्हापूर शहरासह गगनबावडा, पन्हाळा, आजरा, शाहुवाडी, चंदगड, राधानगरी या तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे. पंचगंगा नदीवरच्याच शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि भोगवती नदीवरच्या हळदी, शिवगाव, राशिवडे हे बंधारे देखील पाण्याखाली गेल्यामुळे कोल्हापूरवासियांमध्ये पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.