विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अधिवेशनावर भाष्य करत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाला मर्यादा असल्यामुळे यावेळी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे. तसेच पुढील अधिवेशन हे नागपुरातच होणार असल्याचे आश्वासनही अजित पवार यांनी दिले आहे.
अजित पवार म्हणाले, या अधिवेशनामध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार असून विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे संप, पेपरफुटी, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर चर्चा अधिवेशनामध्ये करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदाच्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
आमदारांच्या निलंबनावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, सभागृहात गदारोळ केल्यामुळे या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आमदारांचे निलंबन हे कोणत्याही अन्य कारणामुळे करण्यात आले नाही तर त्यांनी सभागृहात अयोग्य वर्तन केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र पेपरफुटीप्रकरणाबाबत पोलीस तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पेपरफुटीप्रकरणी सीबीआय चौकशी का? असा सवालही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
तसेच विरोधकांनी चहापानावर नेहमीच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे दरवेळी कारण काढून बहिष्कार टाकणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करावी, यासाठी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.