राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत थेट ‘घातपाताचा’ संशय व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे. यानंतर यावर प्रफुल पटेल यांनी आज प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीच्या विलगीकरणावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, “26 तारखेला विधिमंडळाची नेते, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी याच राहतील. आम्हाला विलगीकरणावर कोणतीही चर्चा करायची नाही. आमच्या पक्षाच्या बाबत अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवले आहेत. पण 26 तारखेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी यांच नाव जाहीर होईल”.
तसेच पुढे ते म्हणाले की, “अजित दादांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्याला आणि आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर मोठा आघात बसला आहे.केंद्र सरकारकडून विमानाच्या चौकशीसाठी एअरक्राफ्ट एक्सिडेंट ब्युरो (AAIB) कडे सूत्र हलवण्यात आले आहेत. त्याचसोबत महाराष्ट्र सरकारने सीआयडीची चौकशी देखील लावली आहे. पण मला असं वाटत की, कोणताही कटकारस्थान असो, विमानात कोणता बिघाड असो किंवा विमान कंपनीचे दुर्लक्ष, पायलटचे दुर्लक्ष या सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष देऊन तपास केला पाहिजे. ब्लॅक बॉक्स खराब कसा झाला, तो इथे डीपोड का होऊ शकला नाही, याची सीबीआय द्वारा चौकशी करण्यात यावी. कारण आमच्यापेक्षा सीबीआय याची सविस्तर माहिती देऊ शकते”.
“एवढ्या मोठ्या नेत्याचे असे अपघाती निधन होते त्यामुळे मी आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, हसन मुश्रीफ आम्ही सगळ्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आणि अजित पवार विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली. ही फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या सखोल तपास विविध यंत्रणेद्वारे होत आहे”. पुढे रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर प्रफुल पटेल म्हणाले की, “मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मी फार संयमाने बोलेल आणि माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.