Beed Election 2026: परळीत मोठी राजकीय उलथापालथ; मुंडेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवार गट आणि शिंदे सेनेचा ‘हा’ धक्कादायक निर्णय

शिंदे गटाने एमआयएमसोबत घरोबा केल्यामुळे विरोधकांनी आता 'हिंदुत्वाच्या' मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
Beed Election 2026: परळीत मोठी राजकीय उलथापालथ; मुंडेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवार गट आणि शिंदे सेनेचा ‘हा’ धक्कादायक निर्णय

परळी: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धक्क्यावर धक्के बसण्याचे सत्र सुरूच आहे. अकोटमधील भाजप-एमआयएम युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली असतानाच, आता बीडच्या परळीमध्ये एक अत्यंत अनपेक्षित समीकरण आकाराला आले आहे. परळी नगरपरिषदेच्या गटनेता निवडीच्या निमित्ताने अजित पवार गट, शिंदे गट आणि एमआयएम (MIM) यांनी हातमिळवणी केल्याने राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या आहेत. या नव्या युतीमुळे परळीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत.

परळी नगरपरिषदेत गटनेता निवडीची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि मित्र पक्षांच्या गटाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. या गटाच्या नेतेपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड झाली आहे. मात्र, खळबळजनक बाब म्हणजे या गटात चक्क एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा समावेश करण्यात आला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर एकेकाळी कडक टीका करणाऱ्या एमआयएमला सोबत घेतल्याने स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: V2V Communication: काय सांगता! रस्त्यावर गाड्या आता एकमेकांशी बोलणार; अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींनी केली 'ही' मोठी घोषणा

या नव्या राजकीय समीकरणात संख्याबळाचे गणितही तितकेच रंजक आहे. 35 सदस्यीय नगरपरिषदेत अजित पवार गटाचे 16, शिंदे सेनेचे दोन, एमआयएमचा एक आणि चार अपक्ष अशा एकूण 24 सदस्यांनी मिळून आपला गट स्थापन केला आहे. विशेष म्हणजे, महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) या युतीपासून लांब राहणे पसंत केले आहे. भाजपने आपला स्वतंत्र गट कायम ठेवल्याने महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.

शिंदे गटाने एमआयएमसोबत घरोबा केल्यामुळे विरोधकांनी आता 'हिंदुत्वाच्या' मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. "सत्तेसाठी शिंदे गट कोणासोबतही जाऊ शकतो का?" असा सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात एमआयएमच्या प्रवेशाने भविष्यातील विधानसभा आणि इतर निवडणुकांची गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परळीतील या नव्या 'खिचडी' युतीमुळे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. महायुतीमधील दोन मित्र पक्ष एमआयएमसोबत सत्तेचे सोपान सर करत असताना, भाजप मात्र एकाकी पडल्याचे चित्र आहे. या राजकीय खिचडीचा फायदा कोणाला होणार आणि मुंडे भगिनी-बंधू यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. परळीचा हा 'पॅटर्न' आगामी काळात राज्याच्या राजकारणात नवी दिशा देणार की वाद निर्माण करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा: Tata Steel Chess Tournament : आर. प्रागननंदा आणि वेस्ली सो यांच्या सामन्यात मोठा वाद; 1 सेकंद बाकी असताना घड्याळ थांबवले.. आणि..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version