अमरावती: “दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं” या म्हणीचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे समोर आलेल्या संतापजनक घटनेवरून येत आहे. सोशल मीडियावरील झगमगाट, महागड्या गाड्या आणि ‘रील’च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेक अल्पवयीन मुली एका भयाण चक्रव्यूहात अडकल्याचे उघड झाले आहे. प्रेमाचे नाटक, त्यानंतर लैंगिक शोषण आणि शेवटी आक्षेपार्ह व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेलिंग, असा या नराधमांचा क्रूर खेळ पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार 19 वर्षीय अयान अहमद तन्वीर असून, पोलिसांनी त्याला आणि त्याच्या तीन साथीदारांना उजेर खान, तरबेज खान आणि मोहम्मद साद यांना बेड्या ठोकल्या आहेत. अयान अहमद हा कोणताही कामधंदा न करणारा ‘रोड रोमिओ’ असून, केवळ रील बनवणे आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढणे हाच त्याचा उद्योग होता. वडिलांचा जुन्या कार खरेदी-विक्रीचा (ऑटो डील) व्यवसाय असल्याने, त्या व्यवसायातील थार आणि इतर महागड्या गाड्यांचा वापर तो त्याचा रुबाब दाखवण्यासाठी करत असे. हातातील महागडा आयफोन, पैसा आणि या गाड्या पाहून अनेक तरुणी त्याच्या प्रभावाखाली आल्या. ‘इसे जिंदगी से ज्यादा अपनी जीत प्यारी है…’ हा आरोपी अयान अहमदचा व्हायरल व्हिडिओ चर्चेत आहे.
तपासात समोर आलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. अयानने केवळ मुलींचे शोषण केले नाही, तर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट करून ते त्याच्या मित्रांच्या ग्रुपवर शेअर केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. आतापर्यंत आठ अल्पवयीन मुली आणि महिलांचे 18 अश्लील व्हिडिओ आणि 39 फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या नराधमांकडे केवळ तंत्रज्ञानच नाही, तर पिस्तूलसारखी बेकायदेशीर शस्त्रे असल्याचेही काही व्हिडिओंमधून समोर आले असून, पोलीस आता या शस्त्रांचा आणि आर्थिक स्त्रोतांचा सखोल तपास करत आहेत. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी दिली आहे.
आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून आधी मैत्री करणे, नंतर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणे आणि एकदा का व्हिडिओ हाती आले की त्याद्वारे पीडितेचे जगणे असह्य करणे, अशा दुष्टचक्रात या मुलींना अडकवण्यात आले होते. या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने आता ‘विशेष तपास पथकाची’ (SIT) स्थापना केली आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाची पाळेमुळे नेमकी कुठे आणि किती खोलवर रुजली आहेत, याचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.
सध्याच्या घडीला एकही पीडित मुलगी किंवा तिचे पालक तक्रार देण्यासाठी समोर आलेले नाहीत, ही चिंतेची बाब आहे. मात्र, पोलिसांनी या नराधमांना सोडायचे नाही, असा चंग बांधला आहे. या गुन्ह्यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे आणि या टोळीने आणखी किती मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, याचा तपास आता एसआयटीच्या माध्यमातून केला जात आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना या संदर्भात माहिती द्यायची आहे किंवा तक्रार करायची आहे, त्यांनी पोलिसांच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर महिला पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोशल मीडियाच्या मायाजालात अडकण्यापूर्वी तरुणींनी आणि विशेषतः पालकांनी सतर्क राहणे किती गरजेचे आहे, हेच या परतवाडा प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.