शिमला: हिमाचल प्रदेशच्या राजधानी शिमला येथील राजभवनातील एका ऐतिहासिक टेबलवरून पाकिस्तानचा टेबल फ्लॅग हटवण्यात आला आहे. या टेबलावर 1972 मध्ये भारत-पाकिस्तान शिमला करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. तेव्हापासून या ठिकाणी स्मरणिकेप्रमाणे पाकिस्तानचा ध्वज ठेवण्यात आला होता. मात्र, अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानने शिमला करार रद्द केल्याच्या घोषणेनंतर, या झेंड्याचा फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर तो हटवण्यात आला.
या संदर्भात राजभवनाचे सचिव सी.पी. वर्मा यांनी सांगितले की, झेंडा हटवण्यामागे कोणतेही विशेष कारण नाही. मात्र, राजकीय आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर याचा परिणाम स्पष्टपणे जाणवतो.
हेही वाचा: शरद पवार यांची पत्रकार परिषद; काश्मीर हल्ल्यावर गंभीर भूमिका
1972 साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी 2 जुलै रोजी शिमला करारावर स्वाक्षरी केली होती. करारासाठी वापरण्यात आलेली मेज आणि त्या क्षणाच्या अनेक छायाचित्रांची मांडणी राजभवनातील कीर्ती हॉलमध्ये करण्यात आली आहे. या टेबलावर पाकिस्तानचा टेबल फ्लॅग 53 वर्षांपासून ठेवण्यात आला होता, जो कराराच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून ओळखला जात होता.
मात्र, अलीकडे पाकिस्तानकडून या कराराचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. उरी, पुलवामा आणि अलीकडील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यांनी या कराराच्या मूळ उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पाकिस्तानकडून या कराराचे रद्दबातल घोषित करणे, आणि त्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणून हा ध्वज हटवण्यात आल्याचे स्पष्ट होते.
या घटनेमुळे एक गोष्ट अधोरेखित होते. की इतिहास सन्माननीय असला, तरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्णायक पावले उचलणे आवश्यक ठरते. झेंड्याच्या हटवण्याची ही घटना केवळ एक प्रातिनिधिक कृती नसून, भारताच्या बदलत्या धोरणांचा आणि देशहितासाठी घेतल्या जाणाऱ्या कठोर निर्णयांचा एक भाग आहे. शिमला कराराचा इतिहास महत्त्वाचा असला, तरी त्याचा गैरवापर करणाऱ्या शेजारी देशाला यापुढे सन्मान देणे अशक्य आहे. हेच या घटनेतून दिसून येते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.