मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताकारणात गेल्या काही दिवसांत ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांनी जोर धरला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यातील खासदारांना गळाला लावण्याची मोहीम सुरू होणार, अशी चर्चा होती. मात्र, या संपूर्ण ऑपरेशनला आता भाजप हायकमांडकडून ‘रेड सिग्नल’ मिळाल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन तुतारी’ पुढे नेण्याबाबत भाजपने शिंदेंना थांबण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील खासदारांनी महायुतीत यायचे असल्यास ते थेट शिंदे गटात न येता सुनेत्रा पवार यांच्या गटामार्फत यावे, अशी भूमिका भाजपने स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या ऑपरेशनअंतर्गत शिंदे गटाने मोठी राजकीय खेळी आखल्याची चर्चा होती. शरद पवार गटातील सहा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार पक्षाच्या बाजूला वळवण्याची रणनीती आखण्यात आली होती. सध्या शिंदे गटाकडे सात खासदार आहेत. जर हे 12 खासदार त्यांच्यासोबत आले असते, तर एकूण संख्या 19 वर पोहोचली असती.
या रणनीतीमागे लोकसभा 2029 निवडणुकांचा संदर्भ असल्याचे बोलले जात आहे. 19 खासदारांच्या जोरावर शिंदे गटाला अधिक जागांवर दावा करता येईल आणि महायुतीत सौदेबाजीची ताकद वाढवता येईल, हा त्यामागील मुख्य उद्देश होता. मात्र, भाजपकडून या योजनेला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.
विश्वसनीय सूत्रांनुसार, दिल्ली दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली नसल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या ऑपरेशनबाबत भाजपमध्ये काहीशी सावध भूमिका घेतली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) गटातील काही खासदार नाराज असल्याची चर्चा आहे. महायुती सरकार पुढील काही वर्षे स्थिर राहण्याची शक्यता, निधी मिळवण्यातील अडचणी, तसेच केंद्र आणि राज्यात एकाच आघाडीचे सरकार असण्याचे फायदे या कारणांमुळे काही खासदार भविष्यात भूमिका बदलू शकतात, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
एकूणच, ‘ऑपरेशन तुतारी’ सध्या तरी थांबवण्यात आल्याचे चित्र दिसत असून, पुढील राजकीय घडामोडी पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.