मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात 'शांतता' हा शब्द सध्या कोसो दूर आहे. सत्तासंघर्षाचे नवनवे अंक दररोज रंगत असतानाच, आता 'ऑपरेशन टायगर' नावाच्या एका अदृश्य वादळाने शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली दौऱ्याने या चर्चेला अधिक धार दिली असून, ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी पडझड होणार की काय, अशा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पक्षामधील सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली असून, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चेचे मूळ केवळ बाहेरील हालचालीत नसून पक्षांतर्गत धुसफुशीत दडलेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या खासदारांच्या एका गुप्त बैठकीत नाराजीचा मोठा स्फोट झाला होता. "पक्षप्रमुख आम्हाला वेळ देत नाहीत आणि स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाकडून हवी तशी मदत मिळत नाही," असा थेट आणि गंभीर आरोप खासदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या तोंडावर केला होता.
या बैठकीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह! "जर पक्षप्रमुखांना प्रकृतीच्या काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे पूर्ण महाराष्ट्र का पिंजून काढत नाहीत?" असा रोखठोक सवाल विचारत खासदारांनी त्यांच्या आक्रमक पवित्र्याची चुणूक दाखवून दिली होती.
ठाकरे गटातील शिलेदारांच्या या वाढत्या असंतोषामुळे आणि 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून पुन्हा एकदा गट फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या माहितीमुळे उद्धव ठाकरे यांना स्वतः मैदानात उतरावे लागले आहे.
शिंदे गटाचे नेते दिल्लीश्वरांच्या भेटीगाठी घेत असताना आणि इकडे ठाकरे गटाचे खासदार उघडपणे नाराजी व्यक्त करत असताना, 'मातोश्री'साठी हा काळ अत्यंत कसोटीचा ठरत आहे. राजकारणात "दिल्या घेतल्यावाचून काही मिळत नाही" हे त्रिकालाबाधित सत्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून पाठबळ मिळत नसल्याची भावना खासदारांमध्ये रुजणे, हे कोणत्याही पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जाते. याच नाराजीचा फायदा घेऊन 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करण्याचे प्रयत्न विरोधी गोटातून सुरू असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आजच्या या तातडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे त्यांच्या नाराज शिलेदारांचे मन वळवण्यात यशस्वी होतात की पक्षांतर्गत ही धुसफूस आणखी वाढते, यावर ठाकरे गटाचे भविष्य अवलंबून आहे. पक्षात पुन्हा फूट पडू नये यासाठी 'मातोश्री'कडून कोणते 'डॅमेज कंट्रोल' केले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सत्तेच्या या कुरुक्षेत्रात "आपलेच दात आणि आपलेच ओठ" अशी अवस्था झालेल्या ठाकरेंना आता संघटनेची विस्कळीत झालेली वीण पुन्हा एकदा घट्ट करण्यासाठी त्यांची संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.