खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती दिली. याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा,कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा म्हटल्याची आठवण अरविंद सावंत यांनी सांगितली. तर, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तुडवा या शब्दाचा वापर करत पत्रकार परिषद संपवली. त्यामुळं येत्या काळात शिवसेना खासदार फुटीचा संघर्ष तीव्र होण्याची शक्या आहे.
यानंतर आता महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि संबंधित यंत्रणांना तातडीचा वायरलेस संदेश पाठवून अलीकडील संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर सहा खासदारांना 'Y+' दर्जाच्या सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत. यात ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.
तसेच संबंधित पोलीस युनिट प्रमुखांनी पुढील जिल्हा किंवा आयुक्तालय स्तरावरील सुरक्षा समितीच्या बैठकीत या खासदारांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन ती कायम ठेवणे, वाढवणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या खासदारांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील दौऱ्यांदरम्यान स्थानिक परिस्थिती आणि संभाव्य धोक्याचे मूल्यांकन करून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.