अयोध्या: भारतीय संस्कृतीत आणि कोट्यवधी भाविकांच्या हृदयात 'संकटमोचक' म्हणून विराजमान असलेले दैवत म्हणजे रामभक्त हनुमान. हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपासून ते दक्षिणेच्या महासागरापर्यंत मारुतीरायाची भक्ती अथांग पसरलेली आहे. भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जी केवळ एक वास्तू नसून, त्यामागे शेकडो वर्षांचा इतिहास आणि अढळ श्रद्धेचा जिवंत झरा वाहतो आहे. कुठे हनुमानाची मूर्ती निद्रिस्त अवस्थेत आहे, तर कुठे बजरंगबलीला चक्क दाढी-मिशा आहेत! या प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रमुख मंदिरांची गाथा म्हणजे अध्यात्म आणि चमत्कारांचा एक अनोखा संगमच आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण ही माहिती जाणून घेऊयात.
अयोध्येच्या पावन भूमीत श्रीरामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी 'हनुमान गढी'चे दर्शन घेणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. दहाव्या शतकातील या भव्य मंदिराबाबत अशी अख्यायिका आहे की, खुद्द हनुमानजी येथे एका गुहेत वास्तव्यास होते आणि तिथूनच त्यांनी रामजन्मभूमी म्हणजेच रामकोटचे रक्षण केले. या मुख्य मंदिरात माता अंजनीच्या मांडीवर बसलेल्या बाल हनुमानाची अतिशय विलोभनीय मूर्ती आहे. दुसरीकडे, आध्यात्मिक नगरी वाराणसीतील 'संकट मोचन' मंदिर हे गोस्वामी तुलसीदास यांनी स्थापन केले असून, येथे रामाच्या मूर्तीसमोरच हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. वानरांचा मुक्त वावर असलेल्या या मंदिरात दर्शन घेतल्याने भक्तांची सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
राजधानी दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीतही मारुतीरायाची दोन अत्यंत जागृत देवस्थाने आहेत. कॅनॉट प्लेस येथील 'प्राचीन हनुमान मंदिर' हे महाभारतातील विजयानंतर स्वतः पांडवांनी बांधले होते, असे मानले जाते. येथील दक्षिणमुखी बाल हनुमानाची मूर्ती 'स्वयंभू' म्हणजेच स्वतः प्रकट झालेली आहे.
यासोबतच दिल्लीतील 'मारघाट हनुमान मंदिर' (जमना बाजार) हे देखील तितकेच प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांनुसार, लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणायला जाताना हनुमंतांनी येथे काही काळ विश्रांती घेतली होती. साक्षात यमुना नदी दरवर्षी पावसाळ्यात मारुतीरायाच्या चरणस्पर्शासाठी या मंदिरात येते, हा चमत्कार आजही दिल्लीकर अनुभवतात.
राजस्थानच्या वाळवंटात मात्र हनुमानाची दोन अत्यंत वेगळी आणि अद्भूत रूपे पाहायला मिळतात. चुरू जिल्ह्यातील 'सालासर धाम' हे संपूर्ण भारतातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे हनुमानाला दाढी आणि मिशा आहेत. एका सामान्य शेतकऱ्याला सापडलेली ही अनोखी मूर्ती आज सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असून ती कोट्यवधींच्या श्रद्धेचा विषय बनली आहे. तर दौसा जिल्ह्यातील 'मेहेंदीपूर बालाजी' मंदिर हे वाईट शक्ती आणि दुष्ट उर्जेपासून मुक्ती मिळवून देणारे उत्तर भारतातील सर्वात मोठे आणि प्रभावी केंद्र मानले जाते.
या व्यतिरिक्त, प्रयागराजमध्ये गंगेच्या तीरावर वसलेले 'बडे हनुमानजी' मंदिर हे जगातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे मूर्ती शयनावस्थेत (झोपलेली) आहे. 20 फूट लांब आणि आठ फूट रुंद असलेली ही भव्य मूर्ती 600 ते 700 वर्षे जुनी असून, तिचा अर्धा भाग गंगेच्या पाण्यात विसर्जित झालेला असतो. तिकडे गुजरातच्या जामनगरमधील रणमल तलावाकाठी असलेल्या 1540 साली स्थापन झालेल्या 'बाला हनुमान' मंदिरात एक विक्रम सुरू आहे. येथे 1964 पासून 'रामधुनी'चा अखंड आणि सलग जप सुरू आहे. तर उत्तरेकडे, हिमाचल प्रदेशातील शिमला येथे समुद्रसपाटीपासून तब्बल 8054 फूट उंचीवर यक्ष ऋषींनी बांधलेले 'जाखू मंदिर' संजीवनी बुटीच्या कथेची साक्ष देते. टेकडीवर आजही हनुमंताच्या पावलांचे ठसे अस्तित्वात आहेत. या सर्व मंदिरांमधील वैविध्य आणि भक्तीची ताकद पाहता, 'भक्ती तिथे शक्ती' या उक्तीचा प्रत्यय पदोपदी आल्याशिवाय राहत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.