मुंबई: भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या आडनावाचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या अपमानास्पद शब्दावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “कोकणची जनता हा अपमान कधीही सहन करणार नाही आणि आता उद्धव ठाकरेंना कोकणी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांना थेट इशारा दिला.
“जिहाद्यांसमोर वाकल्याने कणा मोडला”
पत्रकारांशी संवाद साधताना नितेश राणे यांचा रोख अत्यंत आक्रमक होता. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी अमित साटम यांच्या आडनावासंदर्भात जी बदनामी केली आहे, ही त्यांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवतो. मी तर उद्धव ठाकरेंना ‘वाकरे’च म्हणेल. कारण जिहाद्यांसमोर वाकून वाकून त्यांचा कणाच मोडलेला आहे.”
कोकणच्या अस्मितेचा मुद्दा
अमित साटम हे कोकणपुत्र असून त्यांच्यावर केलेली टीका ही संपूर्ण कोकणच्या जनतेचा अपमान असल्याचे नितेश राणे यांनी नमूद केले. “कोकणातील माणसाच्या अस्मितेशी खेळण्याचे धाडस करू नका. तुम्ही एका कोकणी माणसाचा अपमान केला आहे, आता कोकणची जनता तुम्हाला निवडणुकीत याचे चोख उत्तर देईल,” असा सज्जड दमही त्यांनी भरला.
राजकीय संघर्षाला धार
गेल्या काही दिवसांपासून मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र, अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना थेट ‘वाकरे’ संबोधल्यामुळे ठाकरे गट आता याला काय प्रत्युत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई आणि कोकणातील राजकारणात या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.