मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावटळ उठली आहे ती 15 जानेवारीला होणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे. मात्र, याहीपेक्षा अधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे 'राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी' हा संघर्ष संपून दोन्ही गट एकत्र आल्याची. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी गट 'हातमिळवणी' करून मैदानात उतरले आहेत. या ऐतिहासिक युतीवर आणि भविष्यात शरद पवार गट भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती'त सामील होणार का, यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी 'दी इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत सूचक आणि रोखठोक विधाने केली आहेत.
अजित पवार गटाकडून युतीचा प्रस्ताव आला होता का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी 'आम खाओ, पेड मत गिनो' या हिंदी म्हणीचा वापर करत चर्चेला पूर्णविराम दिला. "प्रस्ताव कुणाकडून आला याने काय फरक पडतो? हा पक्षाचा निर्णय होता आणि दोन्ही बाजूंनी तो विचार करून घेतला गेला आहे," असे म्हणत त्यांनी या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, जागावाटपासाठी अजितदादांशी आमचा सातत्याने संवाद सुरू असून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अदानी आणि पवार कुटुंब या वैयक्तिक संबंधांवर स्पष्टीकरण गौतम अदानी आणि पवार कुटुंबाच्या जवळीकीवर नेहमीच टीका केली जाते. बारामतीतील अदानींच्या अलीकडच्या जंगी स्वागतावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अदानी बारामतीला येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. ते तीस वर्षांपासून बारामतीमध्ये भेटायला येत आहेत." महाविकास आघाडीचे मित्रपक्ष अदानींवर टीका करत असले, तरी आमच्या वैयक्तिक संबंधांचा राजकारणाशी संबंध नाही आणि आम्ही ते कधीही लपवले नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पवार कुटुंबातील या पुनर्मिलनानंतर आता शरद पवार गट भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या 'महायुती'त सामील होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सावध पवित्रा घेतला. "मी अफवा थांबवू शकत नाही आणि तर्कवितर्क करायला माझ्याकडे वेळ नाही. जे सध्या अस्तित्वातच नाही, त्याबद्दल मी कसे बोलू शकते?" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. भविष्यात असा निर्णय होऊ शकतो का, यावर त्यांनी "मला कल्पना नाही" असे म्हणत शक्यता पूर्णपणे फेटाळली नाही, मात्र सध्याचे लक्ष केवळ 29 महापालिका निवडणुकांवर असल्याचे आवर्जून सांगितले.
विलीनीकरणाची शक्यता आणि वास्तवाचे भान दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलीनीकरण होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी एक वेगळीच उपमा दिली. "आता पाऊस पडेल की नाही, याचे उत्तर जसे माझ्याकडे नाही, तसेच या प्रश्नाचेही आहे. मी अंदाज वर्तवणारी नाही, मी खऱ्या जगात जगते," असे म्हणत त्यांनी विलीनीकरणाच्या विषयाला बगल दिली. सध्या तरी दोन्ही गट केवळ निवडणुकीपुरते एकत्र आहेत की ही दीर्घकालीन युती आहे, याचे गुपित त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे.
हेही वाचा: Indian Women Cricket: ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर खेळाडूची जागा घेणार मराठमोळी सायली सातघरे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.