Navnath Ban Tweet: ‘तुम्हाला कुर्बाणीसोबतच निष्ठा सिद्ध…’; सुषमा अंधारेंच्या स्टेटसनंतर नवनाथ बन यांचा खोचक टोला

विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सुषमा अंधारेंच्या स्टेटसची चर्चा रंगली.
Navnath Ban Tweet: ‘तुम्हाला कुर्बाणीसोबतच निष्ठा सिद्ध…’; सुषमा अंधारेंच्या स्टेटसनंतर नवनाथ बन यांचा खोचक टोला

Navnath Ban Tweet: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नेत्या सुषमा अंधारे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी समाजमाध्यमावरून अंधारे यांना टोला लगावला आहे.

भाजप नेते नवनाथ बन यांनी आपल्या ट्विटमध्ये सुषमा अंधारे यांचे नाव घेत अप्रत्यक्ष चिमटा काढला. त्यांनी लिहिले की, “ताई, उद्धवजींच्या आमदारकीसाठी कुर्बाणी देण्यापर्यंत ठीक होतं. पण इथे तर अंबादास दानवेंना संधी देण्यात आलीय. त्यामुळे तुम्हाला कुर्बाणीसोबतच निष्ठा सिद्ध करण्यासाठी येत्या काळात आणखी जोरजोरात बांग द्यावी लागणार.”

या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. भाजपकडून हा टोला केवळ राजकीय प्रतिक्रिया आहे की ठाकरे गटातील नाराजीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न, यावर चर्चा रंगत आहे.

हेही वाचा: Sushma Andhare : ठाकरे गटात नाराजीनाट्य, विधानपरिषदेसाठी दानवेंच्या नावाची घोषण होताच अंधारे नाराज

दरम्यान, विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढवावी, असा आग्रह महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी धरला होता. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पक्षाने अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

आदित्य ठाकरे यांनी उमेदवार म्हणून दानवे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याचवेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या समाजमाध्यमावरील स्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा व्हिडिओ ठेवत “आमदारकी, खासदारकी 100 वेळा कुर्बान” असे शब्द लिहिले. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिक उधाण आले.

हेही वाचा: Shiv Sena UBT Candidate: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरेंची माघार

सुषमा अंधारे या ठाकरे गटातील आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विविध मुद्द्यांवर त्या सातत्याने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना दिसतात. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र पक्षाने अनुभवी आणि संघटनात्मकदृष्ट्या मजबूत मानल्या जाणाऱ्या अंबादास दानवे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याच्या ट्विटमुळे वातावरण आणखी तापले आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा राजकीय विनोद मानला आहे, तर काहींनी तो वैयक्तिक टोला असल्याचे म्हटले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version