नाशिक: काल नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांना जाब विचारला होता. या घटनेने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली होती.
मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमातच प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतलेच पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे,” असे सांगत त्यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला. तसेच, “छत्रपती शिवरायांचा आणि महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्यांचा विरोध करणं गैर कसं ठरू शकतं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, “गणवेशात असूनही त्यांची ठाम भूमिका मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा.” माधवी जाधव या कर्मचाऱ्यालाही सन्मान मिळायला हवा, असे मत त्यांनी स्पष्टपणे मांडले.
या वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेत संजय राऊत म्हणाले की, मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली असून माफीही मागितली आहे. “मंत्र्यांनी चूक मान्य केली आहे, नाक घासले आहे, त्यामुळे आता हा विषय ताणण्याची गरज नाही,” असे म्हणत त्यांनी हा वाद अधिक चिघळू नये, असे आवाहन केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.