नाशिक: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे वातावरण तापले असताना नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 ड मधून उमेदवारी अर्ज माघारी घेताना दोन उमेदवारांमध्ये जोरदार वाद होऊन थेट हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा काही वेळ शिल्लक असतानाच ही घटना घडली. माध्यमांच्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असतानाही उमेदवाराने मात्र “असं काही घडलंच नाही” असा दावा केल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी यांच्यात ही हाणामारी झाली. देवानंद बिरारी यांनी प्रभाग क्रमांक 31 ड मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, बाळा शिरसाट यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोघेही भाजप समर्थक आहेत.
दरम्यान, देवानंद बिरारी यांच्या पत्नी वंदना बिरारी या अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेताना काही तांत्रिक बाबींची माहिती घेण्यासाठी महापालिका कार्यालयात आल्या असता हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. वंदना बिरारी जय महाराष्ट्र न्यूजसोबत बोलताना म्हणाल्या “बाळा शिरसाट हे त्यांच्याकडे रागाने पाहत होते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की ते माझ्या पतीच्या अंगावर धावून गेले. अशी वागणूक कोणालाही मान्य नाही.”
दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली असून वातावरण तणावपूर्ण बनले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोघांनाही वेगळे केले आणि मोठा अनुचित प्रकार टाळला.
वंदना बिरारी यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले की, “भाजपकडून उमेदवारी मिळाल्यामुळे जर कोणाला माज आला असेल, तर जनता निवडणुकीत त्याचा योग्य समाचार घेईल.” तसेच या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नाशिकमधील प्रभाग क्रमांक 30 आणि 31 मध्ये उमेदवारीसाठी तीव्र रस्सीखेच सुरू असताना, या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या तासांत घडलेल्या या प्रकारामुळे पक्षांतर्गत शिस्त आणि सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा: Municipal Election Result 2026 : निकालाआधीच विजयी पताका! भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध विजयी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.