Badlapur Egg Selling Racket: बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात मोठा ट्विस्ट; नाशिक आयव्हीएफ सेंटरचे कनेक्शन समोर

बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आले आहे. नाशिकमधील एका आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांची बीज खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून संबंधित डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
Badlapur Egg Selling Racket: बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात मोठा ट्विस्ट; नाशिक आयव्हीएफ सेंटरचे कनेक्शन समोर

Badlapur Egg Selling Racket: राज्यात खळबळ उडवणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. तपासादरम्यान नाशिकमधील एका आयव्हीएफ सेंटरमधून मोठ्या प्रमाणावर महिलांची बीज खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक खुलाशानंतर संबंधित डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी शहरातील एका आयव्हीएफ केंद्राची तपासणी केली होती. या तपासात अनेक संशयास्पद कागदपत्रे आणि नोंदी आढळून आल्या. त्यामध्ये वर्षभराच्या कालावधीत तब्बल 96 महिलांकडून स्त्री बीज घेण्यात आल्याची नोंद असल्याचे उघड झाले. या माहितीमुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द करण्यात आली असून केंद्र सील करण्यात आले आहे. तपासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात केंद्राचे संचालक डॉ. अमोल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात त्यांनी सरोगसी एजंट म्हणून काम केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान, तपास यंत्रणांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. काही महिलांकडून स्त्री बीज एकापेक्षा जास्त वेळा काढण्यात आले का, याचीही चौकशी सुरू आहे. जर हे खरे ठरले, तर या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

याआधी बदलापूरमध्ये स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचे रॅकेट उघड झाले होते. या प्रकरणात काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्यावर उपचाराच्या नावाखाली इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ केंद्रात पाठवून त्यांची बीज काढून त्यांची विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या पोलीस आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे करत आहेत. या रॅकेटमागे आणखी मोठे जाळे असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version