नाशिक: महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील सातपूर परिसरातील वार्ड क्रमांक 11 मध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान अहिरे यांच्यावर एका तरुणाने बंदूक ताणल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
या घटनेदरम्यान प्रचारासाठी फिरू नये, अशी धमकी देण्यात आल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेण्याचे सत्र सुरू असतानाच, “आमच्या वार्डात प्रचारासाठी येऊ नका,” या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर परिसरातील संतप्त जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला बेदम चोप दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, बंदूक ताणणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेबाबत ‘जय महाराष्ट्र’ न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी अधिक माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे, नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कालच भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सभेनंतर सिडको भागात गोंधळ उडाल्याची घटना घडली होती.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी राज्यभरात पोलिसांनी तगडी सुरक्षा व्यवस्था उभी केली असतानाही अशी घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे नाशिकमधील निवडणूक वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.