‘माझी आणि फडणवीसांची दोस्ती जिवाभावाची’

‘माझी आणि फडणवीसांची दोस्ती जिवाभावाची’

राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे’ या जाहिरातीवरून महायुती सरकारमध्ये वादळ निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या जाहिरातीनंतर भाजपने शिंदे गटातील नेत्यांना जाहीर इशाराही दिला होता. त्यानंतर, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जाहिरातीने या प्रकरणाचा उत्तरार्ध करण्यात आला. या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उघड भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र पालघरमध्ये आज झालेल्या ‘शासन तुमच्या दारी’ या कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच जाहिररीत्या याबाबत मोठे विधान करत विरोधकांना खडे बोल सुनावले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचाही उल्लेख त्यांनी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “शासन आपल्या दारी कार्यक्रमातील गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.‘आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री आहे. ही दोस्ती जिवाभावाची मैत्री आहे. आमच्या दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही. तुटणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी. काही म्हणतात जय विरू की जोडी, काहीजण धरम-वीरची जोडी. ही जोडी खुर्चीसाठी, स्वार्थासाठी झालेली नाही. स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना सामान्य जनतेने बाजूला केले,” असा टोलाही शिंदेंनी यावेळी विरोधकांना लगावला.

पुढे शिंदे म्हणाले की,”देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरु केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. पण त्या योजना लोकहिताच्या होत्या. मात्र आता डबल इंजिन सरकार सत्तेत आहे. फडणवीसांच्या अनुभवाचा फायदा मविआने करुन घेतला नाही. आता आम्ही बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या. राज्याला विकासाच्या वाटेवर आणले,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version