पुणे: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालांमध्ये पुणे जिल्ह्यात संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेजुरी आणि इंदापूर या दोन्ही महत्त्वाच्या नगरपरिषदांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर पुरंदरमधील सासवडमध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळवले आहे.
जेजुरी: जयदीप बारभाईंचा मोठा विजय
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एकतर्फी विजय मिळवत निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जयदीप दिलीप दादा बारभाई यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सचिन रमेश सोनवणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. नगरसेवक पदाच्या एकूण 20 जागांपैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे.
इंदापूर: हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का
इंदापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार भरत शहा यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप गारटकर यांचा अवघ्या 120 मतांच्या फरकाने पराभव केला. हा निकाल भाजप नेते हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही अजित पवार गटाने आपला दबदबा कायम राखत बहुतांश जागांवर विजय मिळवला आहे.
सासवड: भाजपचा नगराध्यक्ष विजयी
सासवड नगरपरिषदेत मात्र भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या आनंदी जगताप यांनी विजय मिळवला आहे. सासवडमध्ये पक्षीय बलाबल पाहता भाजपचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत, तर शिवसेना (शिंदे गट) 09 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पुणे जिल्ह्यातील या निकालांमुळे स्थानिक पातळीवर अजित पवार गटाची पकड अद्याप मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर काही ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच चुरस पाहायला मिळाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.