Sangamner Nagarpalika Result: राज्यात महायुतीचा धडाका, पण ‘या’ एका ठिकाणी भाजप-सेनेला भोपळाही फोडता आला नाही; काय आहे कारण?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीने राज्यभर दबदबा निर्माण केला असला, तरी संगमनेर नगरपालिकेत भाजप-सेना युतीला खातेही उघडता आले नाही.
Sangamner Nagarpalika Result: राज्यात महायुतीचा धडाका, पण ‘या’ एका ठिकाणी भाजप-सेनेला भोपळाही फोडता आला नाही; काय आहे कारण?

संगमनेर: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, राज्याच्या राजकारणात महायुतीने आपला दबदबा निर्माण केला आहे. राज्यातील एकूण 288 जागांपैकी 267 जागांचे कल हाती आले असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाने 111 जागांवर आघाडी मिळवत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली मोहोर उमटवली आहे.

महायुतीमधील इतर घटक पक्षांमध्ये शिवसेना शिंदे गटाने 48, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. याउलट, महाविकास आघाडी या निवडणुकीत सपशेल बॅकफुटवर फेकली गेल्याचे दिसत असून काँग्रेस 20, राष्ट्रवादी शरद पवार गट 13 आणि शिवसेना ठाकरे गट केवळ 09 जागांवर मर्यादित राहिला आहे. राज्यातील या महायुतीच्या झंझावातातही संगमनेर नगरपालिकेने मात्र आपला वेगळा राजकीय बाणा दाखवून देत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: Jejuri Saswad Nagarparishad Result 2025: जेजुरी आणि इंदापूरमध्ये अजित पवार गटाचा ‘करिश्मा’; सासवडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष

संगमनेर नगरपालिका ही राज्यातील एकमेव अशी संस्था ठरली आहे, जिथे भाजप-सेना महायुतीला अद्याप आपले खातेही उघडता आलेले नाही. येथे थोरात-तांबे गटाच्या ‘संगमनेर सेवा समिती’ने निर्णायक आघाडी घेत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. यंदा संगमनेरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ‘आमदार पत्नी विरुद्ध आमदार भावजय’ अशी हायव्होल्टेज लढत रंगली होती.

यामध्ये अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यावर 5200 मतांची भक्कम विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, एकूण 30 जागांपैकी संगमनेर सेवा समितीचे 14 नगरसेवक आधीच विजयी झाले असून उर्वरित 16 जागांवरही त्यांचीच पकड दिसून येत आहे. ही निवडणूक तांबे विरुद्ध खताळ अशा थेट संघर्षात रूपांतरित झाली होती, ज्यामध्ये तूर्तास तरी थोरात-तांबे गटाने आपले वर्चस्व अबाधित राखत महायुतीला मोठा धक्का दिला आहे.

राज्यभरातील निकालांचा कल पाहता ग्रामीण आणि निमशहरी भागात मतदारांनी महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी बहुतांश गड काबीज केले असताना, संगमनेरसारख्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी आपली ताकद टिकवून ठेवल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. महायुतीसाठी ही लाट सुखद असली तरी संगमनेरमधील ‘भोपळा’ न फुटणे, हे राजकीय विश्लेषकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा: Balapur Nagarparishad Result : अकोल्यातील बाळापूर येथे Uddhav Thackeray गटाचे बलबीर सिंग करण सिंग कोरिया विजयी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version