दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन विषाणूने देशात शिरकाव केला असून महाराष्ट्रातही सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मुंबई महापौरांनी सांगितले आहे. तसेच नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार असल्याचा इशाराही महापौरांनी दिला आहे. कोरोनानंतर ओमायक्रॉनच्या युद्धात लसीकरण आणि मास्क हीच आपली शस्त्रे आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्ण करून घेणे आणि मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे मुंबई महापौरांनी सांगितले आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. तर लग्न-समारंभ साजरे करताना नियमांचा विसर पडू देता कामा नये, असेही त्या म्हणाल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.