मुंबई: 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' अर्थात प्रवाशांना त्यांच्या अंतिम ठिकाणापर्यंत सुलभतेने पोहोचवण्याच्या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेली मुंबई मेट्रोची एक अत्यंत महत्त्वाची योजना आता गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. 'ॲक्वा लाईन' (मेट्रो मार्गिका 3) सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा पुढचा प्रवास अधिक सुखकर आणि कोंडीमुक्त व्हावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'फीडर बस' सेवेला मुंबईकरांनी अक्षरशः पाठ दाखवली आहे. परिणामी, रिकाम्या धावणाऱ्या बसेसचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने सातपैकी तब्बल चार स्थानकांवरील ही सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या जीवनवाहिनीत नव्याने दाखल झालेल्या भुयारी 'ॲक्वा लाईन'ला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी, स्टेशनबाहेर पडल्यानंतरच्या प्रवासाचे गणित मात्र फिस्कटले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये 'सिटीफ्लो' आणि 'नवकार ट्रॅव्हल्स' या खासगी कंपन्यांच्या सहकार्याने एमएमआरसीएलने प्रायोगिक तत्त्वावर ही वातानुकूलित बस सेवा सुरू केली होती. वांद्रे कुर्ला संकुल, वरळी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, विद्यानगरी, सिद्धिविनायक, कफ परेड आणि सीप्झ अशा सात प्रमुख स्थानकांवरून ही सेवा प्रवाशांच्या दिमतीला हजर होती.
चाकरमान्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या सकाळी सात ते 11 आणि संध्याकाळी चार ते रात्री आठ या वेळेत या बसेस दर 10 मिनिटांनी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मेट्रोतून बाहेर पडल्यानंतर रिक्षा किंवा टॅक्सीसाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा, प्रवाशांना थेट त्यांच्या कार्यालयापर्यंत आरामात पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, अनेक महिने उलटूनही या बसेसना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. गर्दीच्या वेळेतही या बसेस रिकाम्याच धावत असल्याचे निदर्शनास आल्याने या योजनेच्या व्यवहार्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या सेवेला मिळालेल्या थंड प्रतिसादामागे 'आर्थिक गणिते' हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. या फीडर बससाठी एका फेरीचे तिकीट 29 रुपये, तर मासिक पासची किंमत 499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सर्वसामान्य मुंबईकर चाकरमान्याचा रोजचा प्रवास हा प्रामुख्याने लोकल, त्यानंतर मेट्रो आणि मग बस असा विभागलेला असतो. लोकल आणि मेट्रोचे तिकीट काढल्यानंतर, केवळ काही मिनिटांच्या अल्पशा प्रवासासाठी पुन्हा 29 रुपये मोजणे बहुतांश प्रवाशांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यापेक्षा चालत जाणे किंवा शेअरिंगचे स्वस्त पर्याय निवडणे प्रवाशांनी अधिक पसंत केल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
सातत्याने मिळणाऱ्या या नीचांकी प्रतिसादानंतर अखेर एमएमआरसीएलने धोरणात्मक माघार घेत ही सेवा मर्यादित केली आहे. आता सात ऐवजी केवळ तीनच अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांवर वांद्रे कुर्ला संकुल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कफ परेड ही फीडर बस सेवा सुरू ठेवली जाणार आहे. उर्वरित चार स्थानकांवरील सेवा तातडीने थांबवण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी भविष्यात तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणावे लागतील का, हा प्रश्न आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासमोर उभा राहिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.