मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात मुंबई महानगरपालिकेचाही समावेश आहे. आयोगाच्या घोषणेनुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मुंबई महापालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीने तयारी सुरू केली असून, भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या जागावाटपाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाने 125 जागांवर ठाम भूमिका घेतली आहे. यापेक्षा कमी जागा स्वीकारणे हे पक्षासाठी राजकीयदृष्ट्या धोक्याचे ठरू शकते, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर रोजी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे 125 जागांची मागणी मांडली. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84 अधिक 4 असे एकूण 88 नगरसेवक निवडून आले होते आणि ते सर्व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे त्या जागांवर शिवसेनेचाच नैतिक आणि राजकीय अधिकार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
याच बैठकीत शिंदे गटाने भाजपच्या भूमिकेबाबतही स्पष्ट मत मांडले. 2017 मध्ये भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या आणि त्या सर्व जागा भाजपकडेच राहाव्यात, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. उर्वरित जागांवर परस्पर चर्चा करून निर्णय घ्यावा, असा प्रस्तावही शिंदे गटाने ठेवला आहे. मात्र, 100 पेक्षा कमी जागा स्वीकारणे शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या परडवणारे नाही, असे मत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून भाजपा आणि शिंदे गट संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे, आपली ताकद दाखवण्यासाठी ठाकरे गटही आक्रमकपणे मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची लढत यावेळी अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जागावाटपावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा कसा सुटतो आणि शिंदे गटाच्या 125 जागांच्या भूमिकेवर भाजप नेमकी काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत या चर्चांवर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी सध्या मुंबई महापालिकेच्या राजकारणात मोठी उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.