Eknath Shinde On Thackeray Brothers : ‘निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो…’, शिवतीर्थावरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे झालेल्या महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
Eknath Shinde On Thackeray Brothers : ‘निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो…’, शिवतीर्थावरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापले आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांनंतर काल शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानात महायुतीची विराट जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. इतर वेळी त्यांचं लक्ष फक्त नेटफ्लिक्सवर असतं, पण मतदान जवळ आलं की त्यांना पॉलिटिक्स सुचतं," अशा शब्दांत शिंदेंनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

सभेची सुरुवात करताना शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थाच्या अतुट नात्याची आठवण करून दिली. "आम्ही इथे कुणाच्या चुका काढायला किंवा टीका-टोमणे करायला आलेलो नाही. काल इथे जे काही झालं, त्याला आम्ही भाषणाने नाही तर कामाने उत्तर देऊ," असे सांगत त्यांनी विकासाचा अजेंडा स्पष्ट केला. मुंबईत गेल्या दोन वर्षांत झालेल्या कोस्टल रोड, अटल सेतू आणि मेट्रोच्या जाळ्याचा उल्लेख करत त्यांनी महायुतीचे  'व्हिजन 2026' मांडले.

हेही वाचा: Devendra Fadanvis : 'सुरात गाणं गाण्याची जबाबदारी बायकोची…', गाणं गाण्याच्या मुद्द्यावरुन फडणवीसांची भन्नाट प्रतिक्रिया

राज आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर मुंबईच्या हितासाठी एकत्र आल्याचा दावा करत आहेत. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, "जेव्हा बाळासाहेबांची इच्छा होती की दोघांनी एकत्र यावं, तेव्हा स्वार्थासाठी तुम्ही दुरावलात. आता सत्ता हातातून गेल्यावर आणि अस्तित्व धोक्यात आल्यावर तुम्हाला मराठी माणूस आठवला का?" मराठी माणसाचे अस्तित्व कधीच धोक्यात नव्हते आणि आजही नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी 'मराठी अस्मिते'च्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरले.

एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना उद्देशून केलेल्या "दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स" या कमेंटने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. ही टीका थेट राज ठाकरेंच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या अधूनमधून सक्रिय होण्याच्या पद्धतीवर असल्याचे बोलले जात आहे. या विधानामुळे मनसे आणि शिंदे गटातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: BMC : 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, 'दक्षता पथका'ची स्‍थापना

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version