मुंबई : शिवसेना (शिंदे गट) चे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकी दिल्याच्या कथित प्रकारानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील कांदिवली, चारकोप परिसरात मनसेकडून संजय दिना पाटील यांच्या निषेधार्थ बॅनर झळकवण्यात आले आहेत. या बॅनरवर “पत्रकारांना धमकी देणारा आणि बॉम्ब बाळगणाऱ्या संज्या डॉनचा जाहीर निषेध”, असा मजकूर छापण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख करण्यात आला असून, “कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई करणार का?”, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय “हा आदेश सत्ताधारी पक्षातील लोकांना लागू नाही का?”, असा प्रश्नही बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. या बॅनरची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काल उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यात बैठक पार पडली. मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडल्याचे समजते. संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर बैठकीत एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करू नये, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्याचे समजते. तसेच काल व्हिडीओच्या माध्यमातून संजय दिना पाटील यांनीही पत्रकारांबाबत घडलेल्या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.