रुळांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेकडून येत्या १६ एप्रिल रविवारी रोजी हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, रविवारी खारघर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी राज्यभरातून अनेक नागरिक येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारचा हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
येत्या रविवारी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मार्गाने खारघर येथे लाखोंच्या संख्येने नागरिक येणार आहेत. तर, त्याचवेळी हार्बर रेल्वेवर नियमित देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, सोहळ्याला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर येत्या रविवारचा हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे. त्यामुळे आता सोहळ्याला येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेने व्यवस्थित प्रवास करता येणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला, मात्र मध्य रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक कायम राहणार आहे. मध्ये रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळं सीएसटीहून डाऊन जलद मार्गावरील लोकल रेल्वेगाड्या डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सीएसटीहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.