मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची प्रक्रिया 28 किंवा 29 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केली जाईल. यासाठी दिल्लीतून भाजपाचे निरीक्षक महाराष्ट्रात येत असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. विधानसभेच्या कार्यकाळ संपल्यामुळे नियमानुसार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांनी परंपरेला अनुसरुन नवे सरकार स्थापन होईपर्यंत शिंदेंना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महायुतीच्या राज्यातील नेत्यांना मुख्यमंत्री ठरवून त्याचा प्रस्ताव घेऊन दिल्लीत या असे सांगितले आहे. यामुळे पुढील एक – दोन दिवसांत मुख्यमंत्री ठरेल; अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अद्याप याबाबत महायुतीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण सूत्रांकडून आलेले वृत्त महायुतीच्या नेत्यांनी फेटाळलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक नेता उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी होईल. सर्वाधिक मंत्री भाजपाचे असतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना साधारण समसमान मंत्रिपदे देण्याबाबत चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री होतील आणि अजित पवार अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी परस्पर समन्वयासाठी थोडा वेळ लागेल पण राज्यात महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल; असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री कोण होणार हे महायुतीचे प्रमुख नेते ठरवतील. पण जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याला महायुतीतील सर्व घटकांचा 100 टक्के पाठिंबा असेल असेही महायुतीच्या अनेक नेत्यांनी जाहीररित्या सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.