Maharashtra Weather Update: हुडहुडी गायब, आता उकाडा वाढणार; हवामानाचा मोठा यू-टर्न, नेमकं काय घडतंय?

महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत हवामानात बदल होणार असून थंडी आणि उकाड्याचा लपंडाव पाहायला मिळणार आहे.
Maharashtra Weather Update: हुडहुडी गायब, आता उकाडा वाढणार; हवामानाचा मोठा यू-टर्न, नेमकं काय घडतंय?

पुणे: येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील हवेचा अंदाज बदलणार असून, थंडी आणि उकाड्याचा एक अनोखा लपंडाव पाहायला मिळणार आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात किमान तापमानात वाढ झाल्याने बोचरा गारठा आता काहीसा ओसरला असून, त्याऐवजी अंशतः ढगाळ हवामानामुळे दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 24 जानेवारी रोजी तापमानात चढ उतार होऊन थंडी कमी अधिक होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात मात्र अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. पंजाबमधील लुधियाना येथे देशातील नीचांकी 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, गुजरातच्या सुरत आणि केरळच्या कोट्टायममध्ये कमाल तापमान 35.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने तिथे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. देशात हवामानाची ही दोन टोकाची रूपे सध्या अनुभवायला मिळत आहेत.

महाराष्ट्राचा विचार करता, शुक्रवारी जेऊर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथे राज्यातील नीचांकी 12.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. विदर्भात मात्र सूर्याचा ताप अधिक असून, ब्रह्मपुरी येथे राज्याचे उच्चांकी 32.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारठा कमी झाला असला, तरी दुपारच्या वेळी नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा: Earthquake In Tibet: नेपाळनंतर आता तिबेट हादरलं; जमिनीत 10 किमी खोल हालचाल, तिबेटमधील भूकंपाने शास्त्रज्ञांची चिंता का वाढवली?

विभागीय तापमानाचा आढावा घेतल्यास, कोकणात किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, तिथे हवेत अधिक आर्द्रता आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान 12.1 ते 12.5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावले आहे.

पुणे शहरात कमाल तापमान 29.2 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने पर्यटकांना अपेक्षित थंडी जाणवत नाहीये.

हवामान तज्ज्ञांच्या मते, राज्याच्या किमान तापमानात आगामी काळात 2 ते 3 अंश सेल्सिअसने बदल होऊ शकतो. “कधी ऊन, कधी सावली” या स्वरूपाच्या ढगाळ हवामानामुळे थंडीची तीव्रता कमी होईल, मात्र उकाड्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलत्या ऋतुमानाचा हा खेळ आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा: Gold Smuggling Crime: DRI ने उद्ध्वस्त केलं आंतरराष्ट्रीय गोल्ड स्मगलिंग रॅकेट; तब्बल 40 कोटींचं सोनं जप्त, दोघांना अटक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version