मुंबई : राज्यातील शहरी स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याने राज्यातील शहरी भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व महानगरपालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू करण्यात आली असून, प्रशासन, राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये यंदा मतदान पद्धतीत लक्षणीय बदल करण्यात आला असून, मतदारांनी मतदान करताना विशेष दक्षता घेणे आवश्यक ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत काल निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह राज्यभरातील एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी, तर उर्वरित 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. संबंधित महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. सर्व महानगरपालिकांमध्ये मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी निश्चित करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महानगरपालिका कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत शासनाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. मात्र, नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती आणि अत्यावश्यक मदतीसाठी आवश्यक निर्णय घेण्यास मुभा राहणार आहे. तसेच, महानगरपालिका क्षेत्राबाहेरूनही मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणा किंवा कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.
मतदान पद्धतीतही यावेळी महत्त्वाचा फरक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रत्येक प्रभागातून एकच सदस्य निवडला जाणार असल्याने मतदारांना एकच मत द्यावे लागेल. तर उर्वरित 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार एका प्रभागात साधारणपणे तीन ते पाच जागा असतील आणि त्यानुसार मतदारांना तीन ते पच मते द्यावी लागणार आहेत. मतदारांनी ही बाब लक्षात घेऊन योग्य पद्धतीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
महानगरपालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच राबवली जाणार आहे. राखीव जागांवरील उमेदवारांना जात प्रमाणपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, निकालानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द होण्याची तरतूद आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा वापर करण्यात आला आहे.
1 जुलै 2025 या अधिसूचित दिनांकानुसार प्रभागनिहाय याद्या तयार करण्यात आल्या असून, 15 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि मतदार जागरूकता राखण्यासाठी आयोगाने विविध उपाययोजना केल्या असून, नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.