Local Body Election in Maharashtra: हिंगोली स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये गोंधळ; मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि EVM बिघाडाच्या तक्रारींनी मतदानाची सुरुवात

हिंगोलीतील एका घोषणेमुळे मतदानाच्या गुप्ततेवर प्रश्न उपस्थित झाले असून सोलापूरच्या मोहोळमध्ये मशीन बंद पडल्याने मतदान ठप्प झाले.
Local Body Election in Maharashtra: हिंगोली स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये गोंधळ; मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि EVM बिघाडाच्या तक्रारींनी मतदानाची सुरुवात

हिंगोली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना आज सकाळी सुरुवात झाली, मात्र मतदानाच्या प्रारंभीच अनेक ठिकाणी तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी समोर आल्याने मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोलीपासून ते सोलापूरपर्यंत विविध ठिकाणी Electronic Voting Machine (EVM) बंद पडल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. शिवाय, हिंगोलीमध्ये घडलेल्या एका घटनेने मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रातच मोठ्याने घोषणा केल्याने मतदानाच्या गुप्ततेचा भंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मतदानासाठी आलेल्या एका महिलेला ईव्हीएमचे बटण कसे दाबायचे याबद्दल त्यांनी थेट सूचना केल्या, तसेच “सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो” अशी घोषणा मतदान केंद्रातच दिली. नियमांच्या स्पष्ट उल्लंघन मानल्या जाणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाची धांदल उडाली.

हेही वाचा: Local Body Election in Maharashtra : राज्यात रणसंग्राम! मतदारराजाचा कौल कोणाला? मिनी विधानसभेचं मैदान कोण मारणार?

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथेही मतदान प्रक्रिया अडथळ्यात आली. मोहोळ शहरातील नेताजी प्रशाला मतदान केंद्राच्या प्रभाग क्रमांक चार मधील दोन नंबर बुथवरील EVM मशीन तब्बल एका तासापासून बंद आहे. त्यामुळे मतदान थांबले असून मतदार रांगेत प्रतीक्षा करत असताना नाराजी व्यक्त करत आहेत. या ठिकाणी भाजप उमेदवार प्रतिनिधी सोमेश क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर EVM तांत्रिक बिघाडांच्या तक्रारी येत असून, यामुळे सकाळी सुरु झालेल्या मतदानाच्या गतीवर परिणाम झाला आहे. निवडणूक आयोगाने दुरुस्ती पथके तत्काळ तैनात केल्याचे सांगितले असले तरी तांत्रिक त्रुटींमुळे मतदानाचा वेग कमी झाल्याची कबुली मिळाली आहे. मतदारांनीही सुरुवातीपासूनच होत असलेल्या या अडचणींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जालना आणि यवतमाळ मधून सुद्धा EVM मशीन बंदच्या घटना समोर आल्या आहेत. 

निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली दुरुस्ती आणि पर्यायी यंत्रणा वापरून मतदान प्रक्रियेचे सुरळीत नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिवस पुढे सरता परिस्थिती स्थिर होईल अशी अपेक्षा आहे. मात्र मतदानाच्या सुरुवातीलाच उभे राहिलेले हे वाद आणि अडथळे निवडणूक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उभे करत आहेत.

हेही वाचा: Locally Body Eection in Maharashtra: राज्यात मतदानाला सुरुवात; जालना-यवतमाळमध्ये EVM बिघाडामुळे उशीर

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version