मुंबई: राज्यातील 20 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलण्यात आल्या असून, स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरणात मोठा बदल घडला आहे. मागील दोन आठवड्यांपासून जोमाने सुरू असलेला प्रचार अचानक थंडावला असून उमेदवार आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. प्रशासनाने या स्थगित निवडणुकांसाठी नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्या सर्व नगरपरिषदांमध्ये आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल. तर इतर ठिकाणांच्या निवडणुका पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच 2 डिसेंबरला घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात दुहेरी निवडणूक प्रक्रिया पाहायला मिळणार आहे.
मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतील 17 पालिकांच्या हद्दीतील 38 प्रभागांची निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. छाननी टप्प्यात अनेक उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात विविध हरकती नोंदवल्या होत्या. या हरकतींवरील निर्णय प्रक्रिया न्यायालयात गेल्याने संपूर्ण प्रक्रिया विलंबित झाली. दरम्यान, अर्ज माघारी आणि चिन्हवाटपाची मुदतही संपल्यानंतर प्रचारासाठी आवश्यक वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्याचे निर्देश दिले.
आज नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य प्रमुख नेत्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये सभा आयोजित केल्या आहेत. संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि बीड येथे मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे शेवटचा दिवस किती निर्णायक ठरेल हे पाहण्याची उत्सुकता आहे.
दुसऱ्या टप्प्यात ज्याठिकाणी निवडणुका होणार आहेत त्यात बारामती, रेणापूर, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, यवतमाळ, वाशिम, घुग्गुस, देवळी, देऊळगावराजा, बाळापूर, वसमत, मुखेड, धर्माबाद, फुलंब्री, अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी नवीन तारखेनुसार निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल.
निवडणुका पुढे ढकलल्याने राजकीय समीकरणांमध्ये हलचल निर्माण झाली असली, तरी यामुळे उमेदवारांना आपली मोहीम अधिक शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्याची संधी मिळणार असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. आगामी 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाने राज्यातील स्थानिक राजकारणात कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.