BMC Election 2026: मागाठाण्यात ‘नाराजीनाट्य’ संपले; राज सुर्वेंची निवडणुकीतून एक्झिट, नवे चेहरे रिंगणात

त्यांच्या जागी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून, या निर्णयामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील अंतर्गत कलह उघड झाला आहे.
BMC Election 2026: मागाठाण्यात ‘नाराजीनाट्य’ संपले; राज सुर्वेंची निवडणुकीतून एक्झिट, नवे चेहरे रिंगणात

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मागाठाणे विधानसभा क्षेत्रात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आणि कार्यकर्त्यांचा वाढता रोष लक्षात घेता, शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांना अखेर निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. राज सुर्वे यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याने, स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

जागावाटपाची रस्सीखेच आणि फेरबदल

मागाठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 च्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी चढाओढ सुरू होती. अखेर ही जागा भाजपसाठी सोडण्यात आली असून, तिथून भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बदलाबद्दल स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. शिवसेनेने सुरुवातीला प्रभाग 4 मधून संजना घाडी आणि प्रभाग 5 मधून राज सुर्वे यांची नावे निश्चित केली होती, मात्र कार्यकर्त्यांचा रोष पाहता पक्षाने शेवटच्या क्षणी मंगेश पांगारे (प्रभाग 4) आणि संजय घाडी (प्रभाग 5) यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: Shah Rukh Khan: बॉलीवूडनंतर क्रिकेटमध्येही किंग! KKR साठी शाहरुख खानचा मोठा प्लॅन

फेसबुक'वर व्यक्त केली भूमिका

आपली उमेदवारी कापली गेल्याने राज सुर्वे यांच्यावर माघार घेण्याची नामुष्की ओढावली असली, तरी त्यांनी पक्षशिस्तीचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. "आमच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम आहे. कार्यकर्त्यांचा बळी देऊन वैयक्तिक हित साधणे आम्हाला मान्य नाही. प्रामाणिकपणे काम करणारे सहकारी आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत," असे म्हणत त्यांनी पक्षहितासाठी घेतलेल्या निर्णयाचा पूर्ण सन्मान करत असल्याचे जाहीर केले.

आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात संताप

बोरिवली-मागाठाणे मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यपद्धतीवर माजी नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये मोठी नाराजी होती. विशेषतः दहिसर भागात नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल केल्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. प्रभाग 3 भाजपला गेल्याने इच्छुक उमेदवार प्रकाश पुजारी यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रकाश सुर्वे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली होती. या वाढत्या दबावामुळेच अखेर पक्षाला उमेदवारी बदलाचा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे.

राजकीय समीकरणे आणि परिणाम

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत 90 जागा लढवण्याचा निर्धार केला असला, तरी मागाठाण्यातील या घडामोडींमुळे महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. आपल्या मुलाची उमेदवारी मागे घेऊन प्रकाश सुर्वे यांनी तूर्तास कार्यकर्त्यांचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला असला, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही फेरबदल महायुतीच्या मतांवर काय परिणाम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: BMC Election 2026 : महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू युतीला धक्का; उमेदवारी न मिळाल्याने 'हे' पदाधिकारी लढणार अपक्ष

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version