Suresh Wadkar: ‘माधुरी खूप बारीक असल्याने…’ माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांचं लग्न का झालं नाही?

अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या लग्नाबाबत वर्षांनंतर नवा खुलासा झाला आहे.
Suresh Wadkar: ‘माधुरी खूप बारीक असल्याने…’ माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांचं लग्न का झालं नाही?

Suresh Wadkar: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. 80 आणि 90 च्या दशकात तिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि नृत्यकलेने संपूर्ण इंडस्ट्रीला वेड लावलं होतं. त्या काळात माधुरीचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं गेलं, मात्र तिनं नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मौन बाळगलं. अशातच आता वर्षांनंतर एक जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी पहिल्यांदाच उघडपणे कबूल केलं आहे की, माधुरी दीक्षित आणि त्यांचं लग्न जवळजवळ ठरलं होतं. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हा खुलासा केला. माधुरीच्या पालकांनी स्वतः येऊन लग्नाची चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं, ज्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

सुरेश वाडकर म्हणाले की, “हो, माधुरीच्या आई-वडिलांनी माझ्या कुटुंबीयांशी लग्नाची बोलणी केली होती. पुढे काय झालं, हे मलाही नीट माहिती नाही. ती गोष्ट तिथेच थांबली.” या वक्तव्यावर प्रेक्षकांमध्ये एकच खसखस पिकली. त्यांनी हसत-हसत पुढे म्हटलं की, “ही गोष्ट आजही हवेतच लटकलेली आहे.”

हेही वाचा:Amitabh Bachchan Mobbed: गोंधळातही बिग बींचा संयम! सुरतमध्ये चाहत्यांच्या गर्दीत अडकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जे केलं, त्याचं होतंय कौतुक

या कार्यक्रमात सुरेश वाडकरांनी हलक्याफुलक्या शैलीत प्रतिक्रिया देत, “माधुरी हा कार्यक्रम पाहणार आहे. ती समोर आली तर मला चांगलंच मारेल,” असंही सांगितलं. त्यांच्या या विधानावर उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांनी पुढे असा प्रश्नही उपस्थित केला की, “जर माझं आणि माधुरीचं लग्न झालं असतं, तर आज तिचं आयुष्य कसं असतं?”

दरम्यान, काही जुन्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्या काळात सुरेश वाडकर यांनी माधुरीच्या शरीरयष्टीवरून लग्नासाठी नकार दिला होता. माधुरी खूपच बारीक असल्याचं कारण दिलं गेल्याचं सांगितलं जात होतं. तसेच, वाडकर माधुरीपेक्षा वयाने सुमारे 11 वर्षांनी मोठे होते. मात्र या चर्चांवर आजवर माधुरी दीक्षित किंवा सुरेश वाडकर यांच्यापैकी कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा:Natarang Movie: अतुल कुलकर्णीला नव्हे तर भावोजींना ‘नटरंग’साठी होती ऑफर; रवी जाधवांचा धक्कादायक खुलासा

माधुरी दीक्षितने पुढे 1999 साली अमेरिकेत स्थायिक असलेले हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. अरेंज मॅरेज असलं तरी हे लग्न अत्यंत यशस्वी ठरलं. लग्नानंतरही माधुरीने अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत अनेक दर्जेदार चित्रपट केले. ‘आजा नचले’, ‘देढ इश्किया’, ‘गुलाब गँग’ यांसारख्या चित्रपटांमधून तिनं आपली छाप कायम ठेवली.

आज माधुरी दीक्षित आपल्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत असून तिचे दोन मुलगे अरिन आणि रायन नेने यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र सुरेश वाडकरांच्या या खुलाशामुळे माधुरीच्या आयुष्यातील एक न सांगितलेला अध्याय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version