रत्नागिरी: कोकणातील नगरपालिका व नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता आमदार निलेश राणे यांच्या पक्षातील भूमिकेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या विजयानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटात निलेश राणेंना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, पक्षाच्या टॉप फाईव्ह नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होणार असल्याचं बोललं जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना पक्षात निलेश राणेंना मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. इतकंच नव्हे, तर त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागण्याचीही शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेलं यश हे त्यांच्या संघटन कौशल्याचं आणि नेतृत्व क्षमतेचं द्योतक मानलं जात आहे.
मालवण, कणकवली मतदारसंघात यावेळी राणे विरुद्ध राणे असा दोन भावांमधील थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या लढतीत निलेश राणेंनी प्रभावी रणनीती आणि संघटन ताकद दाखवत पक्षाला विजय मिळवून दिला. या निकालामुळे कोकणात शिवसेनेचं वर्चस्व अधिक मजबूत झालं आहे.
यासंदर्भात प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी जय महाराष्ट्र न्यूजसोबत बोलताना सांगितले की, कोकणातील विजयाकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिलं आहे. या यशामुळेच निलेश राणेंना पक्षात अधिक जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून, आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी निलेश राणेंच्या कामगिरीचं कौतुक केलं असून, संघटन बांधणी आणि निवडणूक व्यवस्थापनातील त्यांच्या भूमिकेवर समाधान व्यक्त केलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेत निलेश राणेंची भूमिका अधिक बळकट होण्याची आणि त्यांना नेतेपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता अधिक प्रबळ मानली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.