Kolhapur Election 2026: कोल्हापुरात मोठा राजकीय ट्विस्ट; अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णराज महाडिकांची माघार, काय आहे कारण?

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेते कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
Kolhapur Election 2026: कोल्हापुरात मोठा राजकीय ट्विस्ट; अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णराज महाडिकांची माघार, काय आहे कारण?

कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकीय आखाड्यात उमेदवारी अर्ज भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजपचे तरुण नेते कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतून अनपेक्षितपणे माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी 'महानगरपालिकेची निवडणूक ही प्रामुख्याने कार्यकर्त्यांची आहे' या भूमिकेतून हा निर्णय घेतल्याचे समजते. कालच मोठ्या उत्साहात आणि कुटुंबीयांच्या आशीर्वादाने उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या कृष्णराज यांच्या या पावलामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाची शिस्त आणि संघटनेचा आदेश शिरसावंद्य मानून आपण हा निर्णय घेतल्याचे कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाने उमेदवारी निश्चित करण्यापूर्वीच त्यांनी अर्ज भरला होता, मात्र आता महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे पाहून त्यांनी माघार घेण्याचे ठरवले आहे. इतर निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या उदात्त हेतूने आपण रिंगणातून बाजूला होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाने माझ्या नावाचा विचार केला, हीच माझ्यासाठी समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताना कृष्णराज यांनी स्वतःच्या ताकदीवर आणि मित्रपरिवाराच्या पाठबळावर विश्वास व्यक्त केला होता. खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सध्या अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असल्याने, आपण स्वतः ही धुरा पेलण्यास सक्षम असल्याचे त्यांनी कालच माध्यमांशी बोलताना सांगितले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जोडले गेल्याचा फायदा आणि नागरिकांचा विश्वास हीच खरी पुंजी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, आता पक्षीय धोरणामुळे त्यांनी आपली भूमिका बदलली आहे.

हेही वाचा: Mumbai Local Trains: रेल्वेचा प्रवास अन् गर्दीचं टेन्शन? आता चिंता सोडा; मुंबईकरांच्या सेवेत येणार शेकडो नव्या गाड्या

कोल्हापूरच्या विकासाबाबत त्यांनी मांडलेला दृष्टिकोनही लक्षवेधी होता. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींमध्ये सुसूत्रता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः 'टाऊन प्लॅनिंग'द्वारे नियोजनबद्ध शहर घडवण्याचा आणि एकाच कामावर वारंवार खर्च न करता शाश्वत विकासकामांवर भर देण्याचा त्यांचा मानस होता. राजकारणा पलीकडे जाऊन खेळांच्या माध्यमातून शिस्तबद्ध पिढी घडवण्यावरही त्यांनी भर दिला होता.

राजकारणात आरोप-प्रत्यारोपांपेक्षा कामाला महत्त्व देण्याची त्यांची भूमिका होती. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी आपण विकासकामांवर लक्ष केंद्रित करू, असे त्यांनी अर्ज भरताना ठणकावून सांगितले होते. इतर 80 उमेदवारांसाठी विरोधकांची टीका सहन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. आता जरी ते निवडणुकीच्या मैदानात नसले, तरी समाजकारणात आपण नेहमीच सक्रिय राहू आणि लोकांच्या प्रश्नांसाठी लढत राहू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता कोल्हापूर भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठीशी उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि कुटुंबाचा मी कायम ऋणी राहीन, अशा भावना व्यक्त करत कृष्णराज महाडिक यांनी या प्रकरणावर पडदा टाकला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात एक वेगळा पायंडा पडल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray On BJP: 'भाजपला आम्ही मोठं केलं, आता तेच आम्हाला…'; मनसेशी युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version