खेड: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना खेड तालुक्यात मतदानाच्या पूर्वसंध्येला एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनिता बुट्टे यांचे पती शरद बुट्टे पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना धामणे येथे घडली. शरद बुट्टे पाटील हे काल रात्री एका मित्राकडे गेले होते. तेथून परतत असताना अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करत हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात ते जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. मतदानाच्या आधीच अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, नागरिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. “लोकशाही प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारचे हिंसक प्रकार अत्यंत धोकादायक आहेत,” अशा प्रतिक्रिया उमटत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधी उज्वला रोंदळ यांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.