राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सत्र न्यायालयात केतकी चितळेने वकील न घेता स्वत:ची बाजू न्यायालयासमोर मांडली.
केतकी चितळेला काल ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आले होते. आज केतकीच्या जामीन अर्जावर ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी केतकीने वकील न घेता स्वत:च न्यायालयासमोर युक्तीवाद लढवला. यावेळी केतकीने मी राजकीय व्यक्ती नसून, सामान्य व्यक्ती आहे. मी केलेली पोस्ट एक प्रतिक्रिया असून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असल्याचे केतकीने न्ययालयात सांगितले. मी केलेली पोस्ट ही स्वखुशीने आणि माझ्या मर्जीने केली आहे. तसेच मला लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य नाही का? असा सवालही युक्तिवाद करताना केतकीने न्यायालयासमोर उपस्थित केला. मात्र, सुनावणी अंती ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेला १८ मेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच काल केतकीला पोलीस ताब्यात घेत असताना तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांकडून केतकीवर शाईफेक करण्यात आली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे केतकीविरोधात ठाणे, पुणे, जळगाव, सिंधुदुर्गसहित राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे केतकीचा कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.