मुंबई: पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. काही राज्यांत सत्तांतर झाले, तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी त्यांचे वर्चस्व कायम राखले. या निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना भाजप नेते केशव उपाध्याय यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणुकांनंतर ईव्हीएमवरील आरोप अचानक गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
केशव उपाध्याय यांनी म्हटले की, “काही काळापूर्वी प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आक्षेप घेण्याची जणू एक ठरलेली पद्धतच बनली होती. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर तो मुद्दाच गायब आहे. आता काही ठिकाणी एस.आय.आर.सारखे नवे मुद्दे पुढे केले जात आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “विशेष म्हणजे ज्या राज्यांत अपेक्षित निकाल मिळतात, तिथे निवडणूक आयोग, केंद्रीय यंत्रणा किंवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही; पण निकाल प्रतिकूल लागले की नव्या कारणांचा शोध सुरू होतो. हा विरोधाभास जनतेलाही दिसत आहे.”
पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर एक गोष्ट लक्षात आली का? काही काळापूर्वी प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आक्षेप घेण्याची जणू एक ठरलेली पद्धतच बनली होती. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर तो मुद्दाच गायब आहे. आता काही ठिकाणी एस.आय.आर.सारखे नवे मुद्दे पुढे केले जात आहेत. विशेष… pic.twitter.com/ato0Iil8hU — Keshav Upadhye (@keshavupadhye) May 6, 2026
विरोधकांना लक्ष्य करत त्यांनी आत्मपरीक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. “खरा प्रश्न असा आहे की, पराभवाची कारणमीमांसा आत्मपरीक्षणातून होणार की केवळ आरोपांच्या राजकारणातून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकशाहीतील पराभव आणि विजय स्वीकारण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगताना उपाध्याय म्हणाले, “जनतेचा कौल नम्रतेने स्वीकारून नव्या जोमाने कामाला लागणे, हेच परिपक्व राजकारणाचे लक्षण आहे. सतत सबबी शोधण्यापेक्षा जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी ठोस कामगिरी आवश्यक असते.”
शेवटी त्यांनी सूचक शब्दांत विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, “जोपर्यंत विरोधक आत्मपरीक्षणाऐवजी केवळ कथानक उभारण्यात गुंतून राहतील, तोपर्यंत विकासाच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्यांची वाटचाल अधिक वेगाने होत राहील. हत्ती आपल्या मार्गाने चालत राहतो; सभोवतालच्या आवाजांकडे तो फारसे लक्ष देत नाही.”
एकूणच, पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर ईव्हीएमचा मुद्दा मागे पडल्याचा उल्लेख करत केशव उपाध्याय यांनी विरोधकांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. पराभवानंतर कारणांचा शोध घेण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा संदेश त्यांनी दिला असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.