महाराष्ट्राचे पोलीस महासंचलक, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांनी गाझियाबादच्या आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले ते खरे आहे का? ते महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी सांगावे. नाहीतर १ जुलै रोजी आम्ही मुंब्रा बंद करु. हे मस्करीत घेऊ नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. गाझियाबादच्या पोलिसांनी मोठा दावा केला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यामातून मुंब्र्यातील ४०० मुलांचे धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला. याच आरोपांवर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी ४०० मुलांच्या धर्मांतराचा आरोप असलेल्यांपैकी ४ मुलं तरी दाखवल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असा शब्दही दिला.
“महाराष्ट्रात सद्य जे काय सुरू आहे ते शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. कालच गाझियाबादमधील एका आयपीएस अधिकाऱ्याने घोषित केले की मुंब्र्यामध्ये ४०० मुलांचे धर्मांतर केले. हा मुंब्र्याला बदनाम करण्याचा प्रकार तर आहेच, त्यासोबत हिंदू धर्माला बदनाम करण्याचा विषय आहे. हिंदू धर्माचे मुलं एवढे मूर्ख आहेत का धर्मांतर करायला? त्या आयपीएस अधिकाऱ्याने पेपरवर आकडा जाहीर करावा. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी आहे. त्या आयपीएसने ४ नावे दाखवावी. याची दखल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी घेतली पाहिजे, “असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“ही काय मस्करी लावली? तुम्ही एका शहराला बदनाम करताय. त्या शहराची अर्थव्यवस्था धुळीस मिळवत आहेत. मुंब्रा, शिळमध्ये आज कमीतकमी ५ लाख स्क्वेरफूट अधिकृत बांधकाम सुरु आहे. ही घरे ताब्यात घेण्यासाठी तिथे लोकांची धावपळ आहे. एका सिनियर आयपीएसने पत्रकारांना बातमी द्यायची, कोण बेअक्कल ऑफिसर आहे? याचे खंडन महाराष्ट्रातून झाले पाहिजे. केवळ महाराष्ट्राची निवडणूक जिंकण्यासाठी काय पातळीवर राजकारण चाललंय? केवळ जितेंद्र आव्हाड तिथे आहे म्हणून हे चाललंय. आरे माझ्या एकट्यासाठी तुम्ही काय-काय करणार आहात?,” असा सवाल आव्हाडांनी केला.
“आता कोणी धर्मांतर करत नाही. आता संविधान आलंय. संविधानाच्या आधारावर कोणी धर्मांतर करत नाही. एक काळ होता धर्मांतराचा. तेव्हा तुम्ही त्याला देवळात जाऊ देत नव्हते. त्यांना पाणी पिऊ देत नव्हते. त्यांची सावली तुम्हालाच चालत नव्हती. त्यांची थुंकी तुम्हाला चालत नव्हती. त्यांना गावकुसा बाहेर ठेवायचे म्हणून धर्मांतर व्हायचे. माझ्या धर्मात सन्मान वागणूक मिळत नाही म्हणून दुसऱ्या धर्मात जायचे. पण आता संविधानाने सन्मानाने जगायला मिळत आहे. तुम्ही आज संविधानावर तलवार चालवत आहात, असे आव्हाड म्हणाले. तुमच्या राजकारणापायी, हव्यासापायी अख्खा महाराष्ट्र जाळून टाका. हा वणवा आहे. यात कोणी वाचणार नाही. सर्व जाळून खाक होतील. झोपड्या जळताना ही झोपडी कोणत्या जातीची आहे म्हणून जळणार नाही तर अख्ख प्लास्टिक घेऊन जळणार आहे,” असा दावा आव्हाडांनी केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.