पहलगाम हल्ला : पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर देण्याची वेळ; जयंत पाटील यांची तीव्र प्रतिक्रिया

पहलगाम हल्ला संपूर्ण भारतावर असल्याचे जयंत पाटील यांचे ठाण्यात भाष्य; अतिरेक्यांना धडा शिकवण्याची मागणी, पंतप्रधानांनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी.
पहलगाम हल्ला : पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर देण्याची वेळ; जयंत पाटील यांची तीव्र प्रतिक्रिया

ठाणे: पहलगाममध्ये झालेला हल्ला हा फक्त जम्मू-काश्मीरवर नव्हे, तर संपूर्ण भारतावर झालेला हल्ला आहे. अतिरेकी 300 किमी प्रवास करून आतमध्ये घुसतात, हल्ला करतात आणि निसटतात, ही अतिशय गंभीर बाब आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर ठोस निर्णय घ्यावा. विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी ठाम उभे आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया शरद पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाण्यात दिली.

पाचपखाडी येथील गणेशवाडी भागात उभारण्यात आलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, आजवर सैनिकांवर हल्ले होत होते, पण आता नागरीकांवर थेट हल्ले सुरू झाले आहेत, ही खूप चिंतेची बाब आहे. पहलगाममध्ये जे नागरीक मारले गेले, त्यांचे कुटुंबीय या घटनेचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा लागेल. अतिरेकी गोळीबार करून पसार होतात आणि त्यांचा शोध लागू शकत नाही, हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करणारे आहे.

हेही वाचा:यवतमाळमध्ये 14 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिक आढळले; पोलिस यंत्रणा सतर्क

सर्जिकल स्ट्राईक करून आता भागणार नाही. पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यापुढे अधिक प्रभावी आणि कठोर निर्णय घ्यावेत. देशातील सर्वपक्षीय एकता दाखवून विरोधी पक्षही मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, मोदी साहेबांनी आता ठरवावे की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा. देशातील नागरिक पक्ष, धर्म, जात बाजूला ठेवून एक होऊन सरकारच्या मागे उभे आहेत. सामान्य जनतेलाही आता वाटते की, पाकिस्तानला कठोर शिकवण द्यावी लागेल.

या पार्श्वभूमीवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी आणि कार्यक्षमता यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधकांनी राजकारण न करता सरकारला पाठिंबा दिला असून, देश एकसंधपणे या संकटाशी लढण्यास सज्ज असल्याचे चित्र आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version