जळगाव: राज्यात आज विविध शहरांमध्ये महानगरपालिकांसाठी मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड, तर काही ठिकाणी शाईऐवजी मार्करच्या वापरावरून चर्चा सुरू असतानाच जळगावमधून एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.
जळगाव शहरात एकूण 516 मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान कक्षांच्या खोल्यांवर स्पष्ट नाव अथवा क्रमांक नसल्यामुळे मतदारांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकांच्या वेळी ज्या क्रमाने खोली क्रमांक देण्यात आले होते, त्याच आधारावर मतदार मतदानासाठी आले. मात्र, महानगरपालिका निवडणुकीसाठी खोली क्रमांक बदलण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अनेक मतदारांना आपले नेमके मतदान कक्ष शोधण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका दीपमाला काळे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, मतदारांचा गोंधळ दूर करण्यासाठी कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना सूचना दिल्या जात असून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे.
याचबरोबर काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनच्या मांडणीचा क्रमही चुकीचा असल्याचे समोर आले असून, त्यामुळे मतदान प्रक्रियेत आणखी अडथळे निर्माण झाल्याची तक्रार मतदारांकडून करण्यात येत आहे.
एकीकडे लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदार उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले असताना, अशा नियोजनातील त्रुटींमुळे मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र जळगावमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाकडून या गोंधळावर तत्काळ उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.