Jalgaon Election 2026: एकीकडे आदेशाची पायमल्ली; तर दुसरीकडे विजयाचा जल्लोष, पक्षादेशाला केराची टोपली दाखवत विशाल भोळे बिनविरोध

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे यांची प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवड झाली आहे.
Jalgaon Election 2026: एकीकडे आदेशाची पायमल्ली; तर दुसरीकडे विजयाचा जल्लोष, पक्षादेशाला केराची टोपली दाखवत विशाल भोळे बिनविरोध

जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आज आपले दुसरे खाते उघडले आहे. शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे यांची प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात दंड थोपटलेल्या आठही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने विशाल भोळे यांचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या निवडीमुळे भाजपमधील 'पक्षशिस्त' आणि 'घराणेशाही' यावरून नवा वाद उफाळून आला असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

भाजपच्या केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वाने स्पष्ट आदेश दिले होते की, विद्यमान आमदार किंवा खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पक्षादेशाचे तंतोतंत पालन करत आपल्या कुटुंबातील सदस्याला निवडणुकीपासून दूर ठेवले. मात्र, जळगावमध्ये आमदार सुरेश भोळे यांनी या आदेशाला बगल दिल्याचे दिसून येते. सुरुवातीला त्यांनी पत्नी सीमा भोळे यांचा अर्ज भरला होता, परंतु तांत्रिक अडचणी किंवा पक्षीय दबावामुळे त्यांना एबी फॉर्म न मिळता, अखेर पुत्र विशाल भोळे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली.

हेही वाचा: College Girl Death Case : रॅगिंग आणि छळाला बळी पडली महाविद्यालयातील विद्यार्थिनी; मृत्यूपूर्वीचा 'तो' व्हिडिओ ठरला मोठा पुरावा

या निर्णयामुळे भाजपमधील वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळेल या आशेने पक्षाकडे डोळे लावून बसले होते, मात्र सामान्य कार्यकर्त्याला डावलून थेट आमदारांच्या मुलाला संधी देण्यात आल्याने "पक्षाचे नियम फक्त सामान्यांसाठीच आहेत का?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कार्यकर्त्यांचा हा आक्रोश आगामी काळात पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

स्वतःच्या निवडीवर भाष्य करताना विशाल भोळे यांनी घराणेशाहीचे आरोप फेटाळून लावले आहेत. "प्रभाग क्रमांक 7 हा आमचा जुना गड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझी आई सीमा भोळे या भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पक्षाने यावेळी त्यांना संधी न देता मला संधी दिली आहे. हे प्रतिनिधित्व आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आहे, त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल," असे स्पष्टीकरण विशाल भोळे यांनी दिले आहे.

एकंदरीत, जळगावच्या राजकारणात 'बिनविरोध' निवडीचा आनंद साजरा होत असला, तरी आमदार सुरेश भोळे यांनी पक्षाच्या आदेशाची केलेली पायमल्ली आणि निष्ठावंतांची झालेली गळचेपी यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात मोठी खदखद पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Ajit Pawar On BJP : 'आम्ही कधी महापालिकेची तिजोरी खाली केली नाही'; अजित पवारांची भाजपच्या कामकाजावर सडकून टीका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version