अहमदाबाद: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज टी-20 क्रिकेट विश्वचषक 2026 चा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या निर्णायक लढतीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक सामन्याच्या पार्श्वभूमीवर मैदानात केवळ क्रिकेटच नव्हे, तर संगीत आणि मनोरंजनाचा भव्य उत्सवही रंगणार आहे.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी आयोजित केलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रातील नामांकित कलाकार सादरीकरणाने रंगत वाढवणार आहेत. विशेष म्हणजे गुजरातची लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठक या कार्यक्रमाची सुरुवात करणार असून त्यांच्या गाजलेल्या गाण्यांनी संपूर्ण स्टेडियम दुमदुमून जाणार आहे.
आयसीसीने जारी केलेल्या माहितीनुसार, फाल्गुनी पाठक ‘मैंने पायल है छनकाई’ आणि ‘ओ पिया’ यांसारख्या लोकप्रिय गीतांवर सादरीकरण करणार आहेत. त्यांच्या या कार्यक्रमात सुमारे 50 बॉलिवूड नर्तक-नर्तकियांचा सहभाग असणार असून त्यांच्या नृत्याविष्कारामुळे स्टेडियममध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यानंतर भांगडा संगीतासाठी जगभर प्रसिद्ध असलेले गायक सुखबीर सिंह रंगमंचावर धमाकेदार सादरीकरण करणार आहेत. ‘इश्क (ओ हो हो हो)’ आणि ‘दिल करे’ यांसारख्या सुपरहिट पंजाबी गाण्यांमुळे ओळख मिळवलेल्या सुखबीर सिंह आपल्या जोशपूर्ण संगीत आणि ढोलच्या तालावर चाहत्यांना थिरकायला भाग पाडणार आहेत.
या भव्य कार्यक्रमात सादरीकरण करणाऱ्या या कलाकारांनी सोहळ्याबद्दल विशेष उत्साह व्यक्त केला आहे. इतक्या मोठ्या क्रीडा मंचावर आणि हजारो प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणे ही मोठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. क्रिकेट आणि संगीत या दोन लोकप्रिय गोष्टी एकत्र येत असल्याने वातावरण अधिक रंगतदार होणार असल्याचेही कलाकारांनी नमूद केले. प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय क्षण निर्माण करण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असून स्टेडियममध्ये गाणे सादर करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत, असे कलाकारांनी सांगितले.
#WATCH | Ahmedabad | Singer Falguni Pathak to perform at the ICC Men's T20 World Cup 2026 final between India and New Zealand to be played today. She says, "I am very excited to perform in front of such a large audience at the World's largest stadium, Narendra Modi Stadium…I… pic.twitter.com/mKpezDJzMy — ANI (@ANI) March 8, 2026
या भव्य सोहळ्याचा समारोप आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक रिकी मार्टिन यांच्या सादरीकरणाने होणार आहे. दोन वेळा ग्रॅमी आणि पाच वेळा लॅटिन ग्रॅमी पुरस्कार विजेते असलेले रिकी मार्टिन ‘लिविन ला विडा लोका’, ‘शी बैंग्स’ आणि ‘ला कोपा दे ला विदा’ यांसारख्या जागतिक स्तरावर गाजलेल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये त्यांचे सादरीकरण हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरणार आहे.
#WATCH | Ahmedabad | Singer Falguni Pathak to perform at the ICC Men's T20 World Cup 2026 final between India and New Zealand to be played today. She says, "I am very excited to perform in front of such a large audience at the World's largest stadium, Narendra Modi Stadium…I… pic.twitter.com/mKpezDJzMy — ANI (@ANI) March 8, 2026
दरम्यान, मैदानावर होणाऱ्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी जोरदार संघर्ष होणार आहे. हा सामना आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. आता टी-20 विश्वचषक 2026 चा बहुमान कोणत्या संघाच्या नावावर होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.