Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मध्यरात्री गुप्त भेट झाल्याच्या अफवांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही भेट झाल्याचा दावा काही सोशल मीडिया हँडल्सकडून करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत यावर स्पष्टीकरण दिले आहे.
नेमका दावा काय होता?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मालकीच्या ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, 23 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे तर्क लढवले जात होते.
देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
या चर्चेला पूर्णविराम देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरेंसोबत किंवा आमच्यात अशी कोणतीही भेट झालेली नाही. जर आम्हाला भेटायचे असेल, तर ते लपून-छपून करण्याची गरज नाही. आम्ही खुलेआम भेटू शकतो. आमच्यात लपवण्यासारखे काहीच नाही.”
दरम्यान, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर फडणवीस यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. “काही लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन संभ्रम निर्माण करत आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सना कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.