‘खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी इचलकरंजीत क्रीडा संकुल उभारणार’

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे.
‘खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी इचलकरंजीत क्रीडा संकुल उभारणार’

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी इचलकरंजीला क्रीडासंकुल निश्चितपणे मंजूर करुन देईन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजी वासियांना दिला. इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला येथे कल्लाप्पा आवाडे क्रीडानगरीत आयोजित केलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2024-25 बक्षीस वितरण व निरोप सभारंप प्रसंगी ते बोलत होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, खो-खो या पारंपरिक खेळाला अधिक मोठ्या व्यासपीठावर नेणाऱ्या  कै.भाई नेरूरकर यांचे महाराष्ट्रात खो-खो च्या विकासासाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने कै. भाई नेरूरकर यांच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरणही त्यानिमित्ताने होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात खो-खो या खेळाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय स्पर्धेला 25 लाखाची वाढ करुन एक कोटी केली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, स्पर्धा म्हटलं की हार-जीत होत असते. परंतु जिंकण्या बरोबरच हार स्वीकारण्याचीही ताकद हवी. सगळ्या खेळाडूंच्या वर्तनामुळे खेळ आणि खेळाडू दोघांचाही गौरव वाढला पाहिजे. त्याचबरोबर आपली क्षमता पूर्णपणे पणाला लावून तुम्ही सगळ्यांनी खेळलं पाहिजे.  खो-खो हा वेगाचा, चपळतेचा खेळ असून या खेळाचं दर्जेदार दर्शन आपल्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने इचलकरंजीच्या परिसरातल्या क्रीडा रसिकांना मिळालं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांनी खेळाडूवृत्ती जोपासली पाहिजे. इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो-खो  स्पर्धा आयोजन केल्याबद्दल आयोजकाचे तसेच या स्पर्धेला संजीवनी देणारे सर्व क्रीडाप्रेमी, रसिकांचे, सगळ्या टीमचे तसेच  सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करुन उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, आपण सर्व मिळून खो-खो च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारताला जागतिक स्तरावर अधिक मोठे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया. जानेवारीमध्ये भारताने जिंकलेल्या संघातील सर्वात लहान वयाची खेळाडू वैष्णवी पवार हिचेही विशेष कौतुक त्यांनी केले.
हेही वाचा : Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अमानुष मारहाणीचे 15 धक्कादायक व्हिडीओ समोर! त्या क्लिप्समध्ये नेमकं काय?

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यामध्ये क्रीडा कामगिरीत कोल्हापूर जिल्ह्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, या जिल्ह्याने आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, अनेक खेळाडू, अनेक नामवंत, म्हणजे खाशाबा जाधव पासून ते हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे, गणपतराव आंधळकर, दादू चौगुले, याच भूमीतील ऑलिंपिक जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, टेबल टेनिस खेळाडू शैलेजा साळुंखे, नेमबाज स्वप्नील कुसाळे अशा अनेक खेळाडूंनी या जिल्ह्यामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी राज्यातील अनेक खेळाडू करत आहेत, त्यांना पाठिंबा देणे व त्यांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. जे खेळाडू देश पातळीवर, चांगल्या प्रकारचे खेळ करतात त्यांना नोकरीत 5 टक्के आरक्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचा गौरव करणाऱ्या प्रतिभावंत खेळाडूंना शासन सेवेमध्ये थेट नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. साधारणतः 216 खेळाडूंना नियुक्ती दिलेली आहे तसेच लवकरच 32 खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात येणार आहे, असे सांगून त्यांनी आयोजकांचे व  सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version