Gunratna Sadavarte: ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल; पत्रकार परिषदेत एकामागून एक गंभीर आरोप

निवडणुका जवळ येत असताना गुणरत्न सदावर्तेंनी पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर जोरदार टीका केली.
Gunratna Sadavarte: ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल; पत्रकार परिषदेत एकामागून एक गंभीर आरोप

Gunratna Sadavarte: राज्यातील निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा राजकीय वातावरण तापत चालले आहे. आरोप-प्रत्यारोप, पक्षप्रवेश, निलंबन आणि प्रचारसभांना वेग आला असून सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतो आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीचा. या युतीवर विविध राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक आणि कायदेशीर क्षेत्रातील व्यक्तीही आपली मते मांडताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नेहमीच आपल्या वादग्रस्त आणि अजब वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “मी मुंबईचा एक सामान्य मतदार म्हणून संवाद साधत आहे,” असे सांगत त्यांनी सुरुवात केली. सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर कायदाबाह्य वर्तनाचे आरोप करत, “जे स्वतः कायदा मोडतात तेच इतरांना कायदा शिकवत आहेत,” असा टोला लगावला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कायद्याची समज नसल्याचा आरोप करत, “कायद्याचे मुद्दे समजावून सांगितल्याशिवाय त्यांना गोष्टी कळत नाहीत,” असे विधान त्यांनी केले.

ठाकरे बंधूंनी कायदाबाह्य वचननामा प्रसिद्ध केल्याचा आरोपही सदावर्तेंनी केला. “त्यांची भाषा आता बदलली असून काही प्रमाणात का होईना, विचार करायला त्यांना भाग पाडले गेले आहे,” असे ते म्हणाले. तसेच, राज ठाकरे पर्यावरणाची भाषा करतात, मात्र त्यांच्या सभांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आरोप करत, यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा उल्लेख करत सदावर्ते म्हणाले की, “राजकीय पक्षांना कुठेही हक्काने सभा घेण्याचा अधिकार नाही.” सभांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरून ठाकरे बंधू न्यायालयाचा अवमान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करत “त्यांचा वैचारिक तोल गेला आहे,” असे म्हणत कायदेशीर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरील बांधकाम, कुलाबा येथील पुतळा आणि त्यासाठी घेतलेल्या परवानग्यांवरही सदावर्तेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

निवडणुकांच्या तोंडावर अशा तीव्र आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version