समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर भाष्य करताना, अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हणत सरकारला लक्ष्य केले. तर, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अपघाताच्या मालिकेवरुन सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.
समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी करतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.